back to top
Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeमहाराष्ट्रउस्मानाबादेत आगडोंब; दोन दुकाने जळून खाक

उस्मानाबादेत आगडोंब; दोन दुकाने जळून खाक

 


मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुन्हा मोठी हानी टळली

उस्मानाबाद, दि.  ९ –
फर्निचर आणि ऑटोमोबाइल्स व सर्व्हिसिंग सेंटरला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. उस्मानाबाद शहरातील भानूनगर समोरील रजा कॉलनी भागात आज (दि.8) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वेळीच आग आटोक्यात आली नसती तर इतर दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती; परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे इतर दुकाने मात्र आगीपासून बचावली आहेत. आगीचे भीषण रुप लक्षात घेऊन उस्मानाबाद नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह एक टँकर तसेच तुळजापूर नगर परिषदेच्या अग्शिमन दलाच्या गाडीला देखील पाचारण करण्यात आले होते.

उस्मानाबाद-औरंगाबाद महामार्गावर भानूनगर समोरील रजा कॉलनी भागात व्यापारी संकुल आहे. या संकुलात कादर शेख यांचे ऑटोमोबाइल्स व सर्व्हिसिंग सेंटर आणि गणेश पावले यांचे फर्निचर विक्रीचे दुकान आहे. सुमारे दहा हजार स्क्वेअरफूट जागेत असलेल्या या दोन्ही दुकानांना आज सायंकाळी अचानक आग लागली. दोन्ही दुकानांमधील साहित्याने पेट घेतल्यामुळे बघता बघता आगीचे आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले.   आगीने रौद्र रुप धारण केल्याचे पाहून काही सूज्ञ नागरिकांनी तातडीने थेट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनाच फोनवर माहिती देऊन अग्निशमन दलाची गाडी तात्काळ पाठविण्याची विनंती केली. त्यावर येलगट्टे यांनी  तातडीने अग्निशमन दलाला कळवून घटनास्थळाची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे यांनीही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही दुकाने रस्त्यालगत असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक तात्काळ गाडी घेऊन घटनास्थळी हजर झाले. अग्शिमन दलाच्या कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे बाजूला असलेली इतर दुकाने बचावली. अग्निशमन दलाचे इन्चार्ज सुदाम खरात, फायरमन दत्ता हराळे, चालक संजय कसबे, कुमार नायकल, विकास माने, समीर नरवडे, अक्षय उंबरे, आकाश ढवळे यांच्या पथकाने यासाठी परिश्रम घेतले.


आनंद नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी

व्यापारी दुकांनाना आग लागल्याची माहिती मिळताच आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुकानांमध्ये सिलेंडर अथवा एखादी आगीमुळे स्फोट होऊ शकणारी वस्तू असती तर धोका वाढेल याची भीती अनेकजण व्यक्त करत होते. तर काहीजण दुकानामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बघ्यांच्या जमावाला दूर हटवून अग्निशमन दलाच्या जवानांना वाट मोकळी करुन दिली.घटनेचा पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments