विद्यार्थ्यांच्या जिवितला धोका असल्याने केली चौकशीची मागणी
उस्मानाबाद – श्री श्री रविशंकर विद्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे केली असून चौकशीची मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नंबर 679 मध्ये श्री श्री रविशंकर विद्यालयाची अंदाजे 25 खोल्याचे दोन मजली बांधकाम अनाधिकृत विनापरवाना करण्यात आलेले आहे. सदरील इमारतीचे ले आऊट, बांधकाम परवाना नगर परिषदेकडून घेण्यात आलेला नाही व कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सदरील दोन मजली अनाधिकृत इमारत उस्मानाबाद शहरात बांधण्यात आलेली आहे. सदरील इमारतीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून अनाधिकृत इमारतीमुळे त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.
सदरील इमारत ही श्री. श्री. रविशंकर विद्यालय या संस्थेची असून संस्थेचे विश्वस्त हे श्री. नितीन भोसले आहेत. संस्थेचे विश्वस्त हे जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे कार्यकारी अभियंता (बा.) येथे कार्यरत असून सरकारी नौकरीत असताना सदरील संस्था चालवित आहेत. तथापी सदरील इमारत ही स्वतः सरकारी नौकरी असताना शासनाच्या नियमाप्रमाणे अधिकृतपणे बांधकाम करून उभारण्यात आलेली नाही, संस्थेचे विश्वस्त सरकारी अधिकारी असल्यामुळे संस्थेवर कोणीच आरोप करू शकत नाही असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे.
याबाबत संस्थेचे विश्वस्त नितीन भोसले यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही