उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हा हा अवर्षण जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो .मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुस्तीचे प्रचंड वेड आहे.चांगल्या गुणवत्तेचे कसलेले भरपूर पैलवान जिल्ह्यामध्ये सर्वांना पाहण्यास मिळतात . परंडा तालुक्यातील कंडारी हे गाव महाराष्ट्र चॅम्पियन पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते . याच गावातील डबल उपमहाराष्ट्र केसरी पै.बाळासाहेब पडघम , महाराष्ट्र चँपियन आदेश बापू तिंबोळी, पै.हनुमंत पुरी, पै सागर सुरवसे, पै.हरी घोगरे , लक्ष्मण जाधव पै.कृष्णा घोगरे यांच्यासह अनेक चॅम्पियन पैलवान गावात आहेत. घराघरात नामवंत पैलवान पाहण्यास मिळतात. यावर्षी उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाला सातारा मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्याला लाखमोलाचं पदक देणारा पैलवान सागर सुरवसे सुद्धा याच गावचा सुपुत्र.पैलवान ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान हनुमंत पुरी हे कंडारी गावचा भूषण तर उस्मानाबाद जिल्ह्याचा मान-सन्मान आणि स्वाभिमान होय. कंडारी गावातील सर्व पैलवान गरिबीची जाण असणारे, अल्पभूधारक जमिनीची सेवा करून कुस्ती मेहनत करत असतात. अगदी कोरवाहू व बागायती जमिनीत घाम गाळून मुर्दमकी जोपासली जाते. याच गावातील मातीची पोत आणि कुस्तीची पत महाराष्ट्र पातळीवर सर्वांना अवगत आहे. पै .हनुमंत पुरी यांनी धरणी मातेची सेवा करण्याचं ठरवल,नुसत ठरवलच नाही तर प्रत्यक्ष काळ्या मातीमध्ये काबाडकष्ट करीत तशी कार्यवाही सुद्धा केली .धरणी मातेची सेवा करीत असताना भारतीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचे उत्पादन घेण्याचे ठरवले . या शेतीसाठी त्यांनी पुणे येथील नामांकित वैदय डॉ. अक्षय देशमुख यांचे मार्गदर्शन घेतले .आपल्या शेतात काय पिकते यापेक्षा बाजारामध्ये काय विकते हे पैलवान चाणाक्ष व चतुर पैलवानाला नक्कीच माहिती असते. हेच डोक्यात घेऊन पैलवान हनुमंत पुरी कृर्षीक्षेत्राचा अवलंब केला . याच पद्धतीचा अवलंब करून पैलवान हनुमंत पुरी यांनी आपल्या शेतामध्ये आयुर्वेदिक सफेद मुसळी हे वनऔषधी पिकाची लागवड केली . नियमाप्रमाणे नैसर्गिक खतांचा वापर सुद्धा केला . कमी पाण्यात – कमी क्षेत्रात- जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी सर्व कुटुंबांना सोबत घेत काबाडकष्ट केले . त्यासाठी पिकाची संपूर्ण माहिती घेतली . पैलवान हनुमंत पुरी वडिल नानासाहेब पुरी आई द्रौपदी पुरी यांच्या माध्यमातून सफेद मुसळीची शेती चांगल्या पद्धतीने केली. भारतीय बाजारपेठेत आयुर्वेदिक सफेद मुसळीला अनन्यसाधारण महत्व आहे . बाजार पेठेत याची किंमत प्रति किलो 850/-ते 900/- रु.एवढी आहे . साधारणपणे एका एकरामध्ये – 1500 किलो एवढे विक्रमी उत्पादन घेतले . कुस्ती, शिक्षण सोबत कृर्षी सेवा करण्यासाठी पैलवान हे सदैव अग्रेसर असतात .एकदा चांगला पैलवान चांगल्या पद्धतीने नवनवीन शेती प्रयोग करतो .आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीमध्ये नवोपक्रम पै .हनुमंत भाऊ पुरी यांनी हाती घेतला .खरं तर एक चांगला शेती उपक्रम हनुमंत पुरी यांनी सफेद मुसळीच्या माध्यमातून सर्वांना दाखवून दिला आहे . पैलवानाने इतरांच्या हाताकडे पाहण्यापेक्षा आपल्याच मनगटांच्या जोरावर स्वतःची आर्थिक उन्नती करावी . असा मुलभूत संदेश पै.हनुमंत पुरी यांनी आदर्श घालून दिला आहे. क्रिडा क्षेत्रामध्ये कुस्ती प्रकारात अव्वल चॅम्पीयन ठरलेला कंडारी गावचा सुपुत्र पै.हनुमंत पुरी कृर्षी क्षेत्रासुद्धा कुस्ती मेहनत चालू ठेवून अव्वल व आदर्शवत ठरत आहे . हे सर्व पैलवानांसाठी आर्थिक उन्नतीसाठी व स्व प्रगतीसाठी दिशादर्शक आहे.