तुळजापूर, दि. 13 (प्रतिनिधी) :
तुळजापूर तालुक्यातील माळूंब्रा येथील रहिवाशी असलेले शहीद जवान दत्तात्रय लक्ष्मण वाघमारे वय (51) यांचे एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) पुणे येथे कर्तव्यावर असताना रविवारी (दि.12) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी माळूंब्रा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सन्मानार्थ तामलवाडी पोलीस दलाने बंदुकीतून हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी अमर रहे..अमर रहे.. दत्तात्रय वाघमारे अमर रहे..अशा जयघोषात आपल्या लाडक्या भूमिपुत्राला साश्रूनयनांनी जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला. दत्तात्रय वाघमारे शहीद झाल्याची वार्ता गावामध्ये समजल्यानंतर शोक व्यक्त करण्यात आला. सोमवार (दि.13) रोजी वाघमारे यांचे पार्थिव पुण्याहून माळूंब्रा येथे आणण्यात आले. वाघमारे यांच्या गावातील घराजवळ पार्थिव कांही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत तिरंग्यात लपटलेले पार्थिव गावातील प्रमुख रस्त्यावरून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. शहीद जवान दत्तात्रय लक्ष्मण वाघमारे हे 1971 साली सैन्यदलात दाखल झाले होते. येथे तेरा वर्षे त्यांनी देशसेवा करून परत 2005 साली डिफेन्स सिक्युरिटी फोर्स मध्ये दुबार भरती झाले होते. वरील दोन्ही दलांमध्ये त्यांनी तब्बल तीस वर्ष देश सेवा केली. पुणे येथील खडकवासला कॅम्पमध्ये कर्तव्यावर असताना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दत्तात्रय वाघमारे यांचे निधन झाले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने व शासनाच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तामलवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदूकीतून हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. शहीद जवान दत्तात्रय वाघमारे यांचे चिरंजीव अजय वाघमारे यांनी त्यांच्या चितेस मुखाग्नी दिला. यावेळी मल्हार राणा पाटील, गजानन वडणे, राजसिंह राजेनिंबाळकर, आनंद कंदले, यशवंत लोंढे, नायब तहसिलदार संतोष पाटील, तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.