back to top
Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याशंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामूहिकरित्या उपाययोजना कराव्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे...

शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामूहिकरित्या उपाययोजना कराव्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

                                           


 

उस्मानाबाद,दि.12(प्रतिनिधी) जिल्हयामध्ये सद्यपरिस्थितीत बऱ्याच ठिकाणी सोयाबीन,कापूस, भाजीपाला आणि विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन,कापूस यासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले आहे.


काही शेतकरी विषारी औषध चोळलेले चुरमुरे शेतात टाकून त्याव्दारे गोगलगाय नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहेत. मात्र असे विषारी चुरमुरे खाऊन पशुपक्षी मरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा  कृषी विद्यापीठाने केलेल्या पुढील शिफारशीप्रमाणे कार्यवाही करुन गोगलगाय नियंत्रण करावे.असेही आवाहन श्री. तिर्थकर यांनी केले आहे.


v एकात्मिक व्यवस्थापन


शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.


शेतामध्ये किंवा बागेमध्ये सात ते आठ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकांच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी आणि  त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी ब-याच ठिकाणी वापर केला जातो.   


शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.फळबागेमध्ये झाडाच्या खोडास दहा टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही.गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड(स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा.


 सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रती एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल)प्रती झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे आणि झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या(स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्‍झाम 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे.या गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.


सोयाबीन पिकावरील आकस्मिक किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत 750 रुपये प्रती हेक्टर अथवा 50 टक्के याप्रमाणे ( कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी ) जे कमी असेल त्या रक्कमेपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान देय राहील. त्यासाठी  आपल्या कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या याप्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर आणि अधिक प्रभावीपणे होते. अधिक माहितीसाठी  कृषी विभागाशी  संपर्क करावा.असे आवाहनही श्री.तिर्थकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments