सलगरा, दि.१५ – (प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) सह परिसरात सलग गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उगवण झालेल्या सोयाबीन पिकात पाण्याचे डोह साचले आहेत. तर काही ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते त्याचबरोबर शेतशिवारात पाण्याचे डोह निर्माण झाल्याने नुकतेच आलेले सोयाबीन पाण्याखाली गेल्याने ते पिवळे पडत आहे, तर काही ठिकाणी पेरणी खोळंबली असतानाच दुसरीकडे पेरणी झालेल्या बियाण्याची उगवणही झाली नाही. त्या मुळे हे बियाणे सडते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या मुळे पेरणीवर झालेला खर्च वाया जातो की काय याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
संपूर्ण जुन महिना सरल्यानंतरही दमदार पाऊस झाला नव्हता त्या मुळे अनेकांनी अत्यल्प पावसावर पेरणी उरकली होती. चांगली उगवणही झाली नंतर काही शेतकरी चांगल्या दमदार पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने जमिनीत आवश्यक इतका ओलावा न झाल्याने परिणामी उर्वरित शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. ज्या शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पेरणी केली आहे त्यांच्यावर उन्हाळ्यात सुप्तवस्थेत गेलेल्या गोगलगायी पावसामुळे पोषक वातावरण निर्माण झाल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्या मुळे पेरणी होऊन सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असलेल्या सलगरा, गंधोरा, किलज, वाणेगाव, वडगाव, शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या फडात शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढला आहे. या गोगलगायी सुर्यप्रकाश नसताना रोपावर हल्ला करून चांगलाच ताव मारत आहेत. पिके रोप अवस्थेत असताना या कोवळ्या पिकांना अर्ध्यातून कुरतडून गोगलगाय पिकांचे नुकसान करीत आहे. बहुतांश भागावरील पीक गोगलगायीनी फस्त केले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून दुबार पेरणीच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके नष्ट होत आहेत. त्यामुळे वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच राहत असून उगवलेले जोपासावे कसे हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडलाय उगवलेल्या कोवळ्या रोपांचा गोगलगायी फडशा पाडत आहेत. गोगलगायींचे नियंत्रण कसे करावे, यासाठी कृषी विभागाने शास्त्रशुद्ध माहिती द्यावी, तसेच या संकटाला तोंड देण्यासाठी आणि परिस्थिती बघून दुबार पेरणीसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकरी – बळवंत सुधाकर गरड
एकात्मिक व्यवस्थापन –
शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.
शेतामध्ये किंवा बागेमध्ये सात ते आठ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकांच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी ब-याच ठिकाणी वापर केला जातो.
शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा. फळबागेमध्ये झाडाच्या खोडास दहा टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड(स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा.
कृषी सहायक – संतोष रंदवे