उस्मानाबाद -विघ्नहर्ता गणरायाचे उस्मानाबाद शहरातील नागरिकांनी भव्य स्वागत केले.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात गणपतीचे स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई, बस स्थानक परिसर, बसवेश्वर चौक परिसरात कालपासूनच गणपतीच्या मूर्त्या विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या. गणेश भक्तांनी सकाळपासून गणेश मुर्त्या खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यासोबत गणपतीस आवश्यक असणारे सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गणेश उत्सवात महागाईचे संकट असले तरी गणेश भक्त मनोभावे उत्सव साजरा करण्यात असल्याचे दिसून येते आहे.
यावर्षी गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट नसले तर नागरिकांना महागाईचा झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षी कोरानाचे सावट असल्यामुळे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला नव्हता यावर्षी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले.परंतु यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती पासून ते प्रसाद सजावट व पूजेच्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाली आहे यावर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे यातच बाप्पांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादांमध्ये प्रति किलो २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे तर सजावटीच्या साहित्यात १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.