दोन महिन्यातच खडी उखडली!
उस्मानाबाद – शहरात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते झाल्याची ओरड नागरिकांकडून केली जाते. संबंधित कामाचे कंत्राटदार प्रशासनाची भीडदास्त न ठेवता कशी कामे करतात याचा प्रत्यय शहरातील एका रस्त्याच्या कामानिमित्ताने येत आहे. पोलीस मुख्यालय पाठीमागील बाजूने आणि जिल्हा परिषदेच्या लागून समर्थ नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापूर्वीच झाले होते. आता त्या रस्त्यावरील खडी उखडू लागली असून येत्या काही दिवसात हा रस्ता पुन्हा खड्डामय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर जिल्हा न्यायाधीशांचे निवास आहे. याबाबत नगर परिषदेतील स्थापत्य अभियंता दुबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कामाबाबत मला माहिती नाही मुख्याधिकाऱ्यांना विचारा अशी उडवा उडविची उत्तरे दिली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरी कल्याण येलगट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कंत्राटदाराचे कामाचे बिल दिले नसून त्याच्याकडून रस्ता दुरुस्त करून घेण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली.