गाडीचा हप्ता भरण्यासाठी साथीदारासह केली तारेची चोरी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

0
103

धाराशिव, दि.22 ऑगस्ट :
धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यात पवनचक्कीवरून ॲल्युमिनियमच्या तारांच्या चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि पथक हे गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार विशाल रामा काळे (वय २१, रा. पारधी पिढी, भुम) हा संशयित चोरीचा मुद्देमाल घेऊन विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सिताफिनेजवळ पकडले. त्याच्या पिकअप वाहनातून पोलिसांना ॲल्युमिनियम तारेची बंडले आढळली.

चौकशीअंती काळे याने कळंब व वाशी तालुक्यातील बावी, सरमकुंडी व मस्सा शिवारातील पवनचक्की खांबांवरून तारा चोरी केल्याची कबुली दिली. तपासात त्याच्या विरोधात अशाच प्रकारच्या सहा गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून ८९८ मीटर लांबीचे २ लाख ६९ हजार ४०० रुपयांचे ॲल्युमिनियम तारे व पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासात आरोपीने अन्य साथीदारांची नावेही सांगितली असून त्यांच्या सहभागाबाबतही पोलिस तपास करत आहेत. आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी वाशी पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फराहान पठाण, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरेनागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here