धाराशिव पोलीसांनी ५ लाख किंमतीचे हरवलेले ३३ मोबाईल केले परत

0
165

धाराशिव, दि. २१ ऑगस्ट :
धाराशिव जिल्ह्यातील सायबर पोलीसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून तब्बल ५ लाख ३ हजार ४३१ रुपयांच्या किंमतीचे ३३ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले आहे. हे मोबाईल आज छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते, मा. पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या उपस्थितीत संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले.

केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईल शोधासाठी सीईआयआर (Central Equipment Identity Register – CEIR) हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत कार्यान्वित करण्यात आले असून, नागरिकांना आपला मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तक्रार थेट या पोर्टलवर नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सन २०२४ व २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेल्या हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तक्रारी सीईआयआर पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३३ मोबाईल शोधून काढण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत ५,०३,४३१ रुपये इतकी आहे.

मोबाईल परत मिळाल्यामुळे उपस्थित फिर्यादींनी पोलीसांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोनि शेख, पोशि ६४० सुर्यवंशी, पोशि १८९४ अंगुले, कळंब ठाण्याचे पोशि ९७६ नारळकर, नळदुर्ग ठाण्याचे पोशि ३४५ दांडेकर व शहर पोलीस ठाण्याचे पोशि १८७१ क्षिरसागर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here