धाराशिव, दि. २१ ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जिल्हानिहाय युवक महोत्सव यंदापासून धाराशिवसह चारही जिल्ह्यात आयोजित केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात हा महोत्सव ८ व ९ सप्टेंबर रोजी अणदूर येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे.
युवक महोत्सवाच्या तयारीसाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. वैशाली अंभुरे तसेच सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत महोत्सवाच्या आयोजनाबाबत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ठरवण्यात आले की, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील युवक महोत्सव संपल्यानंतर लगेच केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये घेण्यात येईल. जिल्हास्तरीय महोत्सवात गुणानुक्रमे पहिले तीन संघ केंद्रीय महोत्सवात सहभागी होतील.
जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार, धाराशिव जिल्ह्यातील ९२ महाविद्यालयांचे संघ जवाहर महाविद्यालय, अणदूर येथे सहभागी होतील. महोत्सवाचे आयोजन सहा गटांत करण्यात येईल, ज्यात एकूण २८ कलाप्रकार सादर केले जातील. यामध्ये शोभायात्रा हा स्वतंत्र कलाप्रकारही समाविष्ट आहे.
कलाप्रकाराचे विभागवार वितरण पुढीलप्रमाणे आहे:
- संगीत विभाग (१० प्रकार): भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वरवाद्य), नाटयसंगीत, भारतीय सुगम संगीत, भारतीय समूहगान, भारतीय लोकसंगीत वाद्यावृंद, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य संगीत, पाश्चिमात्य समूहगाय.
- नृत्य विभाग: भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकसमूह नृत्य.
- नाट्य विभाग: एकांकिका, प्रहसन, नक्कल, मूक अभिनय.
- वाङ्मय विभाग: वादविवाद, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व.
- ललित कला विभाग: स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, इंस्टालेशन, लघुचित्रपट.
युवक महोत्सवानंतर लोककला महोत्सव जानेवारीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवात पोवाडा, भारुड, वासुदेव, गोधळ, भजन, लोकगीत, लोकनाट्य, जलसा, कव्वाली, लावणी, कवितावाचन, शोभायात्रा या १२ कलाप्रकार सादर होतील.
नोंदणी प्रक्रिया:
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा जिल्हा युवक महोत्सव ८ ते ३० सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. सर्व विद्यार्थी, कलावंत, साथीदार व संघप्रमुखांनी २१ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसह सर्व कागदपत्रे जोडून ३ सप्टेंबरपर्यंत हार्ड कॉपी हरिश्चंद्र साठे, विद्यार्थी विकास विभाग यांच्याकडे जमा करावी, असे संचालक डॉ. वैशाली अंभुरे यांनी स्पष्ट केले.
या महोत्सवातून युवकांमध्ये कला, संस्कृती व सृजनशीलतेचा प्रसार होईल, तसेच विद्यापीठस्तरीय व केंद्रीय स्तरावरील स्पर्धात्मक संधी मिळणार आहेत.
उपस्थित महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व:
- जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य: डॉ. उमाकांत चन्नशेड्डी
- व्यवस्थापन परिषद सदस्य: डॉ. अंकुश कदम
- ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केला ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024’: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा अव्वल
- अंगणवाडी पाडली; दोघांवर गुन्हा दाखल
- ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी : शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरमागे 50 हजार रुपये मदत द्यावी
- धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना : बँकेतून 19 लाखांची रक्कम, शेळ्या व घरफोडीत सोनं-रोख लंपास
- खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची १.२० लाखांची फसवणूक