तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन समाज एकजुटीचा संकल्प
तुळजापूर –
मराठा समाजाच्या न्याय्य आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण रथयात्रेचा आज तुळजापूर येथे उत्स्फूर्त स्वागत सोहळा पार पडला. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक श्री. रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही रथयात्रा पंढरपूर व सोलापूर मार्गे श्री क्षेत्र तुळजापुरात दाखल झाली.
श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन रथयात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. समाजबांधव, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथयात्रेचे स्वागत केले.
प्रसार माध्यमांशी बोलताना श्री. रामभाऊ गायकवाड म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी २०१८ साली आम्ही आझाद मैदानावर लढा दिला. आज पुन्हा एकदा सरकारला जाग आणण्यासाठी रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही.”
तुळजापूरनंतर रथयात्रा लातूरकडे मार्गस्थ झाली असून, प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या स्वागत व सभा यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. समाजातील तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा सक्रिय सहभाग रथयात्रेला बळ देत असून, राज्यव्यापी ही चळवळ आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
- अतिवृष्टीग्रस्त शेती पिकांचे सरसकट पंचनामे करा – आमदार तानाजीराव सावंत यांचे महसूल प्रशासनाला निर्देश
- डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचे सूत्रधार अद्याप मोकाट,‘अंनिस’च्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
- गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
- तुळजापुरात मराठा आरक्षण रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
- धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना