वर्ग २ जमिनीबाबत विधानसभेतील आश्वासनाची अंमलबजावणी करावी – आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
61

धाराशिव, भोगवाटादार वर्ग-दोनच्या जमिनीचे वर्ग-एक मध्ये रुपांतर करताना शर्तभंग नजराणा फक्त एकदाच आकारावा, या संदर्भातील आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र अद्याप महसूल विभागाकडून या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आठवण करून दिली आहे.

आमदार पाटील यांच्या पत्रात म्हटले आहे की, इनाम जमिनीच्या संदर्भातील भोगवाटादार वर्ग-दोन जमिनीचे वर्ग-एक मध्ये रुपांतर करताना शर्तभंग नजराणा पाच टक्के इतका आकारण्याबाबतचे विधेयक 17 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर चर्चा करताना पाटील यांनी सुधारणा सुचवली होती की, ज्या जमिनीचे हस्तांतर अनेक वेळा झाले आहे, त्या प्रकरणांमध्ये एकाचवेळी शर्तभंग नजराणा आकारावा.

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिले होते की, जमीनीचे हस्तांतर कितीही वेळा झालेले असले तरी शर्तभंग नजराणा फक्त एकदाच आकारला जाईल. मात्र, अद्याप महसूल विभागाकडून या संदर्भातील आदेश निर्गमित झालेले नाहीत.

“सभागृहात दिलेले आश्वासन पाळावे आणि महसूल विभागास तातडीने आदेश काढण्यास सांगावे,” अशी स्पष्ट मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here