जो तेरणा कारखाना निवडणूक लढवून ताब्यात घेतला ७२ शेतकऱ्यांना कारखान्याच्या कर्जापोटी जमिनी विकाव्या लागल्या, पोटाला चिमटा लावून शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडले, त्यावेळी तेरणा कारखाना कोणाच्या ताब्यात होता? तुमचा खंदा शेतकरी कार्यकर्ता कर्जापोटी जमीन कारखान्याला देतो त्याच्या लिलावाच्या उद्वेगाने त्याच्या चिठ्ठीत तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो अन् तुम्ही शेतकऱ्याचा कळवळा असल्यासारखं दाखवता असे म्हणत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला. खा. राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खा. राजेनिंबाळकरांनी बाष्कळ बडबड थांबवावी, पुतना मावशीचे प्रेम आणि मगरीचे अश्रू दाखवू नये, महायुतीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद पाहून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी खा. राजेनिंबाळकर यांनी आपलं संसदेतील पहिलं भाषण ऐकावं मोदी साहेब मोदी साहेब जप किती वेळा केला हे देखील पहावं असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेवरून केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील, रामदास कोळगे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.