जिल्हा रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून सूचना
सोलापूर, दि. ४ (प्रतिनिधी) :- दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघात संख्येचा विचार करता, हेल्मेटसक्ती तसेच चारचाकी वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी सीट बेल्ट सक्तीची कडक अंमलबजावणी करावी. याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव तथा कायदेशीर सल्लागार ॲड. हर्षीत खंडार यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, परिविक्षाधीन आयपीएस नौमी साटम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आणि संतोष कुलकर्णी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पंढरपूरचे प्रकल्प संचालक आय. व्ही. नारायणकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, महामार्ग सुरक्षा पथकाचे रंजन सावंत आदि उपस्थित होते.
ॲड. हर्षीत खंडार म्हणाले, दुचाकी वाहनांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी. अधिकाधिक नागरिकांचा रस्ते सुरक्षा अभियानात सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.
सुरक्षा कवच उपक्रमाचे कौतुक
उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या सुरक्षा कवच उपक्रमाचे ॲड. हर्षीत खंडार यांनी कौतुक करून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचा संस्कार रुजण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. तसेच, या उपक्रमाची व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करावी, असे ते म्हणाले.
प्रारंभी जिल्ह्यातील सर्व महामार्ग, महत्त्वाची देवस्थाने, शहर व ग्रामीण भागातील जास्त अपघात होणारी ठिकाणे, मागील तीन वर्षात झालेल्या अपघातांची संख्या इत्यादी बाबींची माहिती देवून त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना व विविध उपक्रमांचे सादरीकरण मोटर वाहन निरीक्षक सागर पाटील यांनी केले.
यावेळी विजय गायकवाड, वाय. बी. वेळापुरे, एम. ओ. मदान, ए. जी. सायकर तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.