तुळजापूर, दि.24 (प्रतिनिधी) :तालुक्याचा आमदार झाल्यावर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करू अशा घोषणा करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. परंतु प्रत्यक्षात गेल्या चार वर्षात कुठलीही मोठी विकास योजना न आणता, उलट तालुक्याचा विकास दहा वर्ष मागे पडला आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक जगदाळे यांनी सर्किट हाऊस सिटी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यात रखडलेल्या योजनांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने कृष्णा खोरे अंतर्गत तालुक्याला मिळणारे सात टीएमसी पाणी अद्यापही मिळाले नाही, त्यामुळे तालुक्यातील शेती ओलीचा खाली अजूनही आली नाही. रेल्वे प्रश्न मार्गी लागला मार्गी लागला असे वारंवार सांगितले जाते, परंतु त्याचे प्रत्यक्ष काम अजूनही सुरू झाली नाही. तुळजापूरसाठी पंधराशे कोटी रुपयांची केंद्राची योजना आणली असे वारंवार सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात कशा प्रकारचा केंद्राचा कुठला आदेशही निघाला नाही, तुळजापूर शहर विकासासाठी 158 कोटी रुपये निधी मंजूर झाला असे सांगितले जाते, त्याचीही कुठे अंमलबजावणी झाली नाही.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त म्हणून तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अजूनही सोडविला नाही, पैसा नसल्याने सातवा वेतन देता येत नाही असे सांगितले जाते. परंतु तुळजाभवानी मंदिरामार्फत जिल्ह्यामध्ये शाळा सुधारण्यासाठी दहा कोटी रुपये निधी देण्यात आला. सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल काढण्यासाठी मंदिराकडून 50 कोटी मागणी करण्यात आली आहे, तर कौशल्य विकास विद्यापीठ काढण्यासाठी मंदिराकडे 15 कोटीची मागणी करण्यात आली आहे, जर मंदिराकडूनच सर्व पैसा घ्यायचा असेल तर तुम्ही सरकार मधले आमदार असून त्याचा उपयोग काय असा प्रश्न पडला आहे.
एमआयडीसी सारखा रोजगारभूमिक प्रश्न महत्त्वाचा आहे, पण यावर देखील तालुक्यात एक एकर देखील जागा अधिग्रहण केली नाही, मग एमआयडीसी होणार कशी तालुक्याचा विकास होणार कसा मागील निवडणुकीत निवडून येण्यासाठी तालुक्यातील लोकाला मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या, पण विकास कुठे गेला, हाच कळत नाही. फक्त सोशल मिडीयावर पोस्ट फिरवून आपण असे असे काम केले सांगणे म्हणजे तालुक्याचा विकास नव्हे असा घणाघात जगदाळे यांनी केला.
आता जनता यांना कंटाळली आहे, त्यांना बदल हवा आहे, तो बदल महाविकास आघाडी करणार आहे, यासाठी आपण परत एकदा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्यादारी जाणार आहोत, कोणतेही आश्वासन न देता फक्त कृतीतून विकास काम करणार आहोत आणि हाच आपला अजेंडा राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी यावेळी सांगितले.