अक्कलकोट (प्रतिनिधी) – मार्गशिर्ष महिना व नाताळ सुट्टीमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून, यंदा १० लाखांहून अधिक भाविक येतील असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने प्रशासनाकडून वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. भाविकांना सुलभ सुविधा मिळण्याकामी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी सकल स्वामी भक्तातून होत आहे.
सतत वाढत चाललेल्या गर्दीने वाहतुकीची कोंडी, निवासासाठी प्रतीक्षा व नाहक त्रास, अरुंद रस्ते व अस्वच्छता यामुळे भाविकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागले आहे. हे शासकीय यंत्रणाने पहिले, सलग आलेल्या सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविकांची संख्या वाढणार असून सदर सुट्टीत प्रचंड गर्दी होणार आहे.
गत दिवाळीच्या सुट्टीमध्ये पहाटे तर दर्शनाची रांग राजे फत्तेसिंह चौक पार झाली होती. भाविकांना दर्शनासाठी आठ ते दहा तास लागत होते. हि पार्श्वभूमी पाहता आगामी सुट्यांच्या दिवशी वटवृक्ष देवस्थान, मुरलीधर मंदिर, समाधी मठ (चोळप्पा मठ), गुरु मंदिर (बाळप्पा मठ), राजेराय मठ, शिवपुरी, नवसाचा मारुती मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व अन्नछत्र मंडळ व परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे दर्शनासाठी व महाप्रसादाकरिता गर्दी होणार आहे.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये पोलिस प्रशासनाने शहरातील वाहनांची कोंडी टाळावी म्हणून कमलाराजे चौक, कारंजा चौक, मैंदर्गी रोड या ठिकाणी बॅरिकेडिंग करून वाहनांना मंदिर परिसरात सोडले नाही. त्यामुळे भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने लावण्यात येत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडली होती. असे होता कामा नये याकरिता प्रशासनाने वादळा पूर्वीची शांतता म्हणून आत्तापासूनच काटेकोरपणे नियोजन करणे काळाची गरज आहे.
समाधी मठाजवळ दाटीवाटीने भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचावे लागते, याबाबत प्रशासनाने सुटसुटीतपणा आणण्याकामी विशेष योजना आखणे गरजेचे आहे. यामध्ये येथील काही रस्ते वनवे करणे गरजेचे असून, तेथील रहिवाश्यांनी देखील होणार्या गर्दीमुळे प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे