डी एस गायकवाड
अकलूज(प्रतिनिधी)
- भाजपावाढीस कारणीभूत ठरलेले मोहिते पाटील भाजपासाठी पायात भिंगरी बांधून जंग जंग पछाडताना दिसत आहेत ते जीवाचे रान करताना दिसत आहेत. न थांबता न थकता भाजपासाठी आणखी वातावरण सुपीक करताना दिसत आहेत पण अशा परिस्थितीत फक्त पदे घेऊन आपणच भाजपाचे तारणहार असल्याच्या अविर्भावात फिरून काही नेते मंडळी फक्त मलीद्याला उठताना दिसत आहेत. म्हणजे भाजपा वाढविणार मोहिते पाटील आणि त्याची फळे चाखायला मात्र अनेक जण टपलेले दिसत आहेत. त्यामुळे कोण काम करतय यावरून झटतय कोण आणि फुकटात नटतय कोण अशी चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असताना दिसत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपामध्ये एकमेकांना पाण्यात पाहण्याचेच धंदे जोमात सुरू आहेत. मुळात पक्ष कोणी वाढवला हे पाहणे गरजेचे बनले आहे आणि आता सुद्धा पक्षासाठी तन-मन-धनाने कोण काम करत आहे हेही पाहणे पक्षाच्या हिताचे ठरणार आहे. मोठमोठाली पदे घेऊन अनेक जण भाजपमध्ये सध्या स्वतःच्या पोळ्या भाजून घेताना दिसत आहेत.पक्ष वाढीसाठी ते कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. फक्त वरिष्ठ नेते मंडळी आली की त्यांच्या पुढे पुढे करायचे, त्या नेते मंडळींना मिसगाईड करायचे, पक्षासाठी आजचे सुपीक वातावरण हे माझ्यामुळेच झाले आहे असा अविर्भाव दाखवायचा हेच उद्योग सध्या सुरू आहेत.त्यामुळे मनापासून झटणारे कार्यकर्ते नेते बाजूलाच राहताना दिसत आहेत. काही जणांना तर इतकी मोठी पदे दिली आहेत की त्यांचे योगदान शून्य आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाचा देखील पत्त्या नाही. त्यामुळे आता भाजपा पक्षाला सतर्कता दाखवावी लागणार आहे. काम करणाऱ्यांना पदे दिली पाहिजेत. जे बिनकामाची पदे घेवून मिरवत आहेत त्यांना पक्ष वाढीसाठी आपले योगदान काय हे पक्षाने विचारले पाहिजे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी चांगले वातावरण आहे पण हे वातावरण अशा मंडळीमुळे बिघडताना दिसत आहे.दुसरीकडे मोहिते पाटील मात्र अचूक धोरण आखून पक्षवाढीसाठी योगदान देताना दिसत आहेत. मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक तालुक्यात ते संपर्क अभियान राबवून, वेगवेगळ्या शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करून,पक्षाची संघटनात्मक ताकद उभा करताना दिसत आहेत. बूथ रचना सक्षम करून सूक्ष्म नियोजनाने ते पक्षाला आणखी मजबुतीकडे घेऊन जाताना दिसत आहेत. अशा अवस्थेत काहीजण पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा नेत्यांना वेळीच भाजपाने रोखले पाहिजे. वातावरण चांगले असताना काही मंडळी ते खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर पक्षाने अंकुश ठेवला पाहिजे. पक्ष ध्येय धोरणाने पुढे जातो ती ध्येय धोरणे अचूकरित्या मोहिते पाटील राबवताना दिसत आहेत याची प्रचिती गत लोकसभा निवडणुकीत आलेली आहे. कमी कालावधीत मोहिते पाटलांनी हे अद्वितीय यश मिळवून दिले होते. आता त्यांच्या नेतृत्वामुळे पूर्वीपेक्षाही आणखी भक्कमपणा वाढला आहे. पण पक्षातील वरिष्ठ मंडळीनी देखील आता पक्षांमध्ये कलुशीत वातावरण कोण निर्माण करत आहे हे तपासले पाहिजे आणि सच्चा नेतृत्वाच्या पाठीमागिल बळ वाढवले पाहिजे.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाची क्रेझ
- भाजपाचे संघटन महामंत्री म्हणून कार्यरत असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भाजपाला जुडताना दिसत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी पक्षासाठी सक्षम अशी बूथ यंत्रणा लावली आहे. सर्व स्तरात मिसळून काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख असल्याने अनेक युवक भाजपामध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यांच्या धोरणी नेतृत्वाचा भाजपाला फायदा होत असताना दिसत आहे. एवढा मोठा मतदार संघ असताना सुद्धा संपूर्ण मतदारसंघांमध्ये फिरून कार्यकर्त्यांची मोळी बांधणारे ते भाजपातील एकमेव नेते ठरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे माढा मतदारसंघात भाजपा निर्विवाद वर्चस्व मिळवेल असे वातावरण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी त्यांचे थेट कनेक्टिंग असल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावाचा सध्या जोर मतदार संघात वाढताना दिसतो आहे. असंख्य कार्यकर्त्यातून त्यांच्या उमेदवारीची मागणी आतापासूनच होताना दिसत आहे.