विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आघाडी, युती किंवा स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर राज्यात विरोधीपक्ष आहे की नाही अशी परिस्थिती होती. मात्र गुढीपाडव्यानंतर राज ठाकरेंनी सभा घेतली सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची चिरफाड केली. मरगळलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला बळ येथूनच मिळाले त्यानंतर राज ठाकरेंनी 10 सभामंधून टीकेची तलवार धारधार ठेवली. परप्रांतीय मतांच्या भितीपोटी काँग्रेस मनसेला सोबत घ्यायला तयार नव्हती मात्र राष्ट्रवादीतील एक गट मनसेला सोबत घेण्याची इच्छा बाळगून होता. राज ठाकरेंनी मात्र कोणासोबतच न जाता एकला चलो रे ची भूमिका घेतली. पक्ष स्थापनेनंतर मनसेला चांगले यश मिळाले ते स्वबळावरच आणी जागाही कमी झाल्या एकटे असतानाच. मनसेला स्वबळाचा इतिहास आहे तो विधानसभेच्या वेळी टिकणार नाही असा अंदाज आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी राज ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली. ते बदलाचे दिशादर्शक आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करा असे त्यांनी कोणत्याच सभेत सांगितले नाही मात्र मोदी-शहा जोडीला सत्तापटलावर पुन्हा येऊ देऊ नका असा पुनरूच्चार वारंवार केला. परंतू लोकसभेत जे व्हायचे तेच झाले भाजप -शिवसेनेच्या तेवढ्याच जागा आल्या. सध्याही राज्यात सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका करणारा कोणताही नेता नाही. यातच राज ठाकरेंनी काँगेस नेत्या सोनिया गांधीची भेट घेतली. ठाकरे घराण्याने नेहमी गांधी घराण्यावर टीका केली आहे. खुद्द राज ठाकरेंनी सोनिया गांधीची भाषणातून कित्येकदा नक्कल केली आहे. बाबासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींची घेतलेली भेट वगळता दोन्ही घराण्यात भेटीचे योग आलेले नाहीत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील सत्ता समीकरण बदलण्यासाठी राज ठाकरे महत्वाची भूमिका बजावू शकतात. मनसे आणी काँग्रेसकडे हारण्यासारखं काहीच उरलेलं नाही मात्र मिळवण्यासाठी खूप काही आहे. उघड उघड आघाडी न करता पडद्यामागून एकमेकांना मदत दोघेही करू शकतात. जेवढे सत्ताधारी मजबूत आहे तेवढाच विरोधीपक्ष मजबूत असावा तरच लोकशाही आनंदाने नांदेल
अग्रलेख -सोनियांच्या दारी ‘राज’ सवारी
RELATED ARTICLES