सलगरा,दि.२८(प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार, दि.२७ जुन रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या अनुषंगाने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित हिंदू – मुस्लिम बांधवांना सपोनि. सिद्धेश्वर गोरे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, समाजातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे सर्वच सण आनंदाने उत्साहात एकोप्याने साजरे व्हावेत ही शासनाची व सर्वच जाती धर्माच्या नागरिकांची भावना असते. त्यामुळे कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करून योग्य ती खबरदारी घेत असते. यामध्ये नागरिकांचे देखील सहकार्य मिळत असल्यामुळे अडचणी येत नाहीत. गंधोरा, किलज, वडगाव, वाणेगाव, आदी गावातील सर्वच नागरिक शांतता प्रेमी असल्यामुळे आजपर्यंत पोलीस प्रशासनाला अडचणी आलेल्या नाहीत. याचा आवर्जून उल्लेख करून त्याबद्दल नागरिकांचे कौतुक केले. येणारे धार्मिक सण आणि उत्सव शांततेने होण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. ईतर जिल्हयातील पडसाद आपल्याकडे येऊ नयेत या साठी खबरदारी म्हणून आज या शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये समाज माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याने सर्व समाज माध्यम म्हणजेच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर सतर्कतेने करावा. सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट जर नियम भंग करणाऱ्या ठरल्या तर या मुळे होणाऱ्या गुन्ह्याचे संबंधिताच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतात. याची जाणीव देखील सगळ्यांना करून देणे गरजेचे आहे खास करून तरुणांना असे ते बोलताना म्हणाले. या वेळी सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, जिवन लोमटे, शशिकांत लोमटे, मुरतुजा पटेल, नजीर पटेल, हरीश पटेल, अब्दुल पठाण, पापा मुलाणी, रहीम पटेल, अहमद शेख, तोहीद पटेल, अजित लोमटे, नवनाथ मुळे, बलभीम लोमटे, गहिनीनाथ लोमटे, अनिल लोमटे, श्रीकांत लोमटे, प्रशांत बोधणे, सुनिल अंदगावकर, राहुल काटवटे, रमेश कांबळे, देवानंद माळी, सतिश स्वामी, इराप्पा मस्के, अविनाश भालशंकर यांच्या सह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, बकरी ईद सणाला मुस्लिम बांधव कुर्बानी देतात परंतु यावर्षी हिंदू बांधवांचा ‘आषाढी एकादशी’ व मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’ हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे हिंदू बांधवांना त्याच दिवशी ‘आषाढी एकादशी’ सण साजरा करावा लागणार आहे. मुस्लिम बांधवांना ‘बकरी ईद’ ला कुर्बानी देण्यासाठी पुढील दोन दिवस असतात. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करून मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त जर एखादा मुस्लिम बांधव कुर्बानी देत असेल तर सर्व मुस्लिम बांधव त्याला विरोध करून शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुस्लिम बांधवांच्या वतीने सांगण्यात आले. या पाठोपाठ गंधोरा, किलज, वडगाव, वाणेगाव या गावांमध्ये पण असाच निर्णय घेण्यात आला आहे. असे त्या त्या गावातील प्रतिष्ठित मुस्लिम बांधवांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगितले.
उद्या २९ तारखेला दोन्ही धर्माचे प्रमुख सण एकाच दिवशी येत आहेत हे धार्मिक सण शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही गावोगावी शांतता कमिटीच्या बैठकी घेत आहोत. या कालावधीत आपला सण साजरा करताना ईतर धर्मियांना सहकार्य व समन्वय राखण्यासाठी या पूर्वी देखील आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील शांतता कमिटीच्या सदस्यांनी चांगले काम केले आहे. त्या मुळे त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि अशीच सतर्कता येणाऱ्या सण उत्सवांच्या काळात देखील राखली जावी अशी आशा बाळगतो, विशेष म्हणजे बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने नागरीकांनी एकमेकांच्या धार्मिक परंपरा व रितीरिवाजाचे आदर करुन सौहार्दपूर्ण वातावरणात सण / उत्सव शांततेत पार पाडावेत. तसेच कुर्बानी अनुषंगाने प्रचलित कायद्यांचे उल्लंघन होणार नाही व इतरांच्या भावना दुखविल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सहायक पोलीस निरीक्षक – सिद्धेश्वर गोरे