उस्मानाबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केले आंदोलन
उस्मानाबाद दि.२७ (प्रतिनिधी) – केंद्र सरकार सतत गॅसच्या किमती वाढवित असून ती दरवाढ शंभर रुपयांवर गेली असून सर्वसामान्यांना गॅस खरेदी करणे व त्याचा वापर करणे आवाक्याच्या बाहेर होऊन बसले आहे. सदरील गॅसची दरवाढ तात्काळ माघारी घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुरेखा नंदकुमार जाधव व अल्पसंख्याक राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण यांच्या नेतृत्वाखाली दि.२७ डिसेंबर रोजी येथील जिजाऊ चौकातील मंगल कार्यालयातच अर्थात लग्न मंडपातच चक्क चुल पेटवून चुलीवर स्वयंपाक करीत या दर वाढीचा निषेध नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे या लग्नासाठी आलेली वऱ्हाडी मंडळी या अनोख्या आंदोलनाकडे आश्चर्याने पाहून या दरवाढीचा निषेध करीत होती.
मागील १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. तर मागील एक वर्षामध्ये करोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना परिस्थिती केंद्र सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशिलता दाखवित मनमानीपणे भरमसाठ दरवाढ करुन महामार्ग च्या काळात सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ यास दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापुढे आमचे लक्ष्य प्रत्येक पेट्रोलपंपावर लावण्यात आलेले प्रधानमंत्री मोदी यांचे फ्लेक्स असतील, एवढे लक्षात असू द्यावे असा खणखणीत इशारा यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुरेखा जाधव, अल्पसंख्यक महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, देवकन्या गाडी संध्या सूर्यवंशी यांच्यासह इतर कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.