धाराशिव –
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे कॅन्सर झाल्याने पुण्यात निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या अणदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. शशिकांत अहंकारी यांचे मूळ गाव खुदावाडी आहे. तेथूनच जवळ असलेल्या अणदूरमध्ये डॉक्टर अहंकारी यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे पती पत्नी जानकी हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते. खेड्यात प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळावी, यासाठी हॅलो फाऊंडेशनची स्थापना केली. समाजातल्या तळागाळातील लोकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून डॉ. अहंकारी यांनी शहरातील डॉक्टर म्हणून फायदेशीर कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला. खेड्यांना अधिक प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळवण्यात मदत करण्यासाठी समर्पित टीमसह १९९३ मध्ये हॅलो मेडिकल फाऊंडेशनची सुरुवात केली. हॅलो मेडिकल फाऊंडेशनचं काम पूर्व महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु होतं. डॉ. अहंकारी यांच्या हॅलो मेडिकल फाऊंडेशनकडून अनेक अतिरिक्त सेवा दिल्या जातात ज्यात दुय्यम-केअर हॉस्पिटल, आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच, शाश्वत शेती आणि विज्ञान शिक्षण इत्यादीचा समावेश आहे.
हॅलो मेडिकल फाउंडेशनमधील त्यांच्या कामामुळे अहंकारी यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय चार समित्यांचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आतापर्यंत पंधरा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला असून हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे कार्य सादर केलं होते. याशिवाय, डॉ. अहंकारी आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनने महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या सर्वोत्कृष्ट एनजीओसाठी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.