झरेगाव प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील झरेगाव येथील श्री विठ्ठल बिरुदेव मंदिर कलशारोहण समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या वेळी कलशाची भव्य अशी मिरवणूक धनगर समाज बांधव झरेगाव मधून काढणार आहेत. या मिरवणुकीमध्ये गजी ढोल पारंपारिक हेमाडपंती नृत्य धनगरी ओव्या आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन भव्य असे विठ्ठल बिरुदेव मंदिर उभारले आहे. या मंदिराला कलश रोहन कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी अंकुश एडके यांच्या घरापासून सकाळी सात वाजता कलश मिरवणूक सुरू होणार आहे. ही मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत धनगर नृत्य करत वीर बुवांना परज खेळवत विठ्ठल बिरूदेव मंदिर येथे जाणार आहे. हेमाडपंती नृत्य अर्थात परज खेळण्यासाठी वीर बुवा अण्णा सोनटक्के, बिभीषण सोनटक्के आणि बिरुदेव कोकाटे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सोबतच निमंत्रित करण्यात आलेल्या वीर बुवांना देखील परज खेळण्याची संधी दिली जाणार आहे. कलशारोहन कार्यक्रमासाठी धनगर समाजातील सर्व लेकींना आमंत्रित करण्यात आले आहे. कलशारोहन मिरवणुकीमध्ये महिलादेखील डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन सहभागी होणार आहेत. मिरवणूक विठ्ठल बिरूदेव मंदिर येथे पोहोचल्यावर सकाळी साडेअकरा वाजता विधिवत पूजा करून धनगर समाजातील मान्यवरांच्या हस्ते कलशारोहण करण्यात येणार आहे. सायंकाळी आठ वाजता महेश महाराज कानेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व धनगर बांधवांनी आणि भाविक भक्तांनी झरेगाव येथे होणाऱ्या श्री विठ्ठल बिरुदेव मंदिर कळस रोहन कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.