प्रहार कडून निवडणूक लढवणे हा राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाग,अजित पवार यांनीच जिल्हाधिकाऱ्यांना तसे सांगितले – महेंद्र धुरगुडे
राजकीय वर्तुळात खळबळ
धाराशिव – निवडणुकांमध्ये युत्या आघाड्या होतात मात्र आपला मित्र पक्ष आपलेच काम करतो आहे का आपल्याला पाडायचं काम करत आहे हे उमेदवारी दिलेल्या पक्षाला समजत नाही. आघाडी धर्म पाळला जात नाही हे समोर यायला खूप मोठा कालावधी निघून जातो. तुळजापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आपला आघाडी धर्म पाळला नसल्याचे महेंद्र धुरगुडे यांनी केलेल्या वक्तव्याने समोर आले आहे
प्रहार कडून निवडणूक लढवणे हा राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाग असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीशी बंडखोरी करून प्रहार प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे आणि सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असणारे महेंद्र धुरगुडे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत( ११ डिसेंबर) बोलताना महेंद्र धुरगुडे म्हणाले की, अपात्रतेची फाईल भाजपने पळवत आणली होती, याबाबत स्वतः अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांना बोलले निवडणूक लढवायला लावणे हा पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याने कारवाई करू नये असे म्हणाल्याचे धुरगुडे यांनी सांगितले.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात होते. भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे 23 हजार 196 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते.
आ.पाटील यांना 99 हजार 34 मते मिळाली तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांना 75 हजार 865 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांना 35 हजार 153 मते मिळाली होती. प्रहार जनशक्तीच्या महेंद्र धुरगुडे यांना सात हजार 423 मते मिळाली होती.
आघाडी धर्म पाळला नाही?
धुरगुडे यांनी सांगितल्याप्रमाणे जर घडले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही हे स्पष्ट होते यावर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते ते पहावे लागेल.
भाजपचा जिल्ह्यात शिरकाव
स्वातंत्र्यानंतर आणि २०१४ च्या मोदी लाटेत देखील भाजपचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचा धाराशिव जिल्ह्यात शिरकाव झाला नव्हता. पहिल्यांदाच तुळजापूर विधानसभेची जागा भाजपने जिंकून जिल्ह्यात कमळ फुलवले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर काँग्रेसच्या उमेदवाराला ताकद मिळाली असती तर चित्र वेगळे असल्याचे आता बोलले जात आहे.