उत्तरपत्रिका तपासणी गैरहजेरी प्रकरणाने घेतले वेगळे वळण
धाराशिव : सेवा प्रवेशोत्तर परीक्षा-2024 च्या उत्तरपत्रिका तपासणी कामास गैरहजेरी लावल्याच्या कारणावरून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस आता वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी “ती नोटीस चुकून आली” असा दावा केल्याने प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने 2 मार्च 2026 रोजी आदेश काढून 6 व 7 मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासणीचे काम आयोजित केले होते. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वरिष्ठांचे आदेश न पाळल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चा भंग झाला आहे. तसेच अनुपस्थितीबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी, “या प्रकरणाची माहिती आम्हाला वृत्तपत्रातून मिळाली आहे. सदर बाब विभागीय आयुक्त स्तरावर असल्याने पुढील आदेश आल्यानंतरच कारवाई करण्यात येईल,” अशी भूमिका मांडली.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात अनंत कुंभार यांनी दिलेला खुलासा लक्षवेधी ठरला आहे. “सदर नोटीस चुकून पाठविण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मला उपस्थित राहण्याचे कोणतेही आदेश नव्हते,” असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने काढलेली अधिकृत नोटीस चुकीची ठरते का? की संबंधित अधिकाऱ्यांना आदेशच देण्यात आले नव्हते? अशा परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रशासनातील समन्वय आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सदर प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे गरजेचे असून, या वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त