सलगरा,दि.५ (प्रतिनिधी)
अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तसेच महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला.
स्वतःला घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली. माईच्या आश्रमात दीड हजारांहून अधिक मुलांनी मोकळया आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं. आश्रमातील अनेक बालकांच्या पंखात बळ भरत माईने त्यांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं, अनेक शासकीय उच्च पदस्थ अधिकारी यांपासून उद्योगपती पर्यंत मायेच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली.
सिंधुताईंच्या याच अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय ९०० हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, मानाचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने देऊन त्यांना नुकतच गौरवलं होतं. माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त करून माईंच्या या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करीत तुळजापुर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.