धाराशिव | प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, आणि कृषी धोरणांतील सरकारच्या निष्क्रियतेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, ११ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता धाराशिव जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या निवासस्थानांवर मशाल आंदोलन करण्यात येणार आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यव्यापी आंदोलन होत असून, धाराशिव जिल्ह्यातील आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मयुर ज्ञानेश्वर काकडे व वर्षद शिंदे करणार आहेत.
धाराशिव, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, कळंब आणि उमरगा या सातही तालुक्यांतील आमदारांच्या निवासस्थानांसमोर हे मशाल आंदोलन होणार असून, “जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आता दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प बसू नये म्हणून आम्ही त्यांच्या दरवाज्यापर्यंत मशाल घेऊन जात आहोत,” असा स्पष्ट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.
प्रहारच्या निवेदनात म्हटले आहे की, “निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व उत्पन्न हमी याबाबत घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. शासन मौन धारण करून बसले आहे आणि आमदारही या प्रश्नांवर कुठलाही आवाज उठवत नाहीत.”
या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ७ एप्रिल रोजी निवेदन स्वीकारले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी म्हणतात की, “आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करणार आहोत. मात्र हे आंदोलन म्हणजे एक इशारा आहे – शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.”
राज्य शासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केवळ सुरुवात असल्याचे संकेतही प्रहारने दिले आहेत. जिल्ह्यातील राजकीय वातावरण या आंदोलनामुळे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
