जिल्हा परिषदेत खळबळ! उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार

0
521

ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचा आरोप — “हुकूमशाही वागणूक, मानसिक छळ सहनशक्तीच्या पलीकडे”

धाराशिव : जिल्हा परिषद धाराशिवच्या ग्रामपंचायत विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अनंत कुंभार यांच्या विरोधात गंभीर तक्रार करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कुंभार साहेब हे कार्यालयीन कामकाजात सतत हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांशी हुकुमशाही पद्धतीने वागतात. घरातील नोकरासारखे बोलतात, आरेरावी शब्द वापरतात आणि अभ्यागतांसमोरही अपमानास्पद भाष्य करतात.”

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, कामकाज योग्य पद्धतीने पूर्ण केले तरी संचिका वारंवार परत केली जाते. “काम येत नसेल तर नौकरी सोडा”, “गुरेराखे तुमच्यापेक्षा चांगले काम करतात” अशा अवमानकारक शब्दांचा वापर केला जातो, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

“आम्ही शासन नियमांनुसार ईमानीने काम करत आहोत, मात्र सततचा अपमान, धमक्या आणि ओरडामुळे मानसिक ताण निर्माण झाला आहे. श्री. कुंभार साहेबांच्या हुकुमशाहीतून मुक्त करून न्याय मिळावा,” अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान ग्रामसेवक संघटना आणि विस्तार अधिकारी संघटना यांचे आज सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत भेटले असून त्यांच्याकडे देखील सर्वांनी ही कैफियत मांडली.

या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here