येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई

0
164

धाराशिव, दि. २ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभाराला चाप बसला आहे. येडशी बसस्थानक हे अधिकृत थांबा असूनही, अनेक बस चालक-वाहक या ठिकाणी बस न थांबवता सरळ बाह्यवळण रस्त्याने मार्गस्थ होतात. यामुळे प्रवाशांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, तक्रारी दाखल न होत असल्याने अशा प्रकारांना आळा बसत नव्हता. आता धाराशिव जिल्ह्यातील सातेफळ (येडशी) येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक दिलीप प. कांबळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अंबड आगाराने संबंधित चालक आणि वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे इतर चालक-वाहकांच्या मनमानीला चाप लागेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

दिलीप कांबळे यांनी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी जालना विभागातील विभाग नियंत्रक, अंबड आगार व्यवस्थापक आणि धाराशिव आगार व्यवस्थापक यांना पत्राद्वारे तक्रार नोंदवली होती. त्यात त्यांनी सोलापूर-जालना (गाडी क्रमांक MH-20 BL 3345, निळ्या रंगाची) या बसच्या चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभाराचा उल्लेख केला आहे. दिलीप कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.५५ वाजता धाराशिव बसस्थानकात ही बस आली. येडशी जाणारे ८ ते १० प्रवासी बस चढत असताना वाहकाने “येडशीवाले बसू नका, ही गाडी जादा आहे. येडशी स्टँडला जाणार नाही, डायरेक्ट येरमाळा जाणारे लोक बसा,” असे बजावले. यामुळे इतर प्रवासी बाजूला झाले, पण गुडघ्याच्या आजारामुळे कांबळे बसून राहिले. वाहकाने त्यांना धाराशिव ते येडशीचे तिकीट दिले.

बस सुमारे १५ ते २० प्रवाशांसह निघाली आणि सायंकाळी ६.२० वाजता येडशीजवळील सोनेगाव रोड चौकात थांबली. वाहकाने बेल मारून बस थांबवली आणि चालकाने कांबळेंना उतरण्यास सांगितले. “आपली गाडी स्टँडला जाणार नाही,” असे सांगून त्यांना तेथेच उतरवण्यात आले. सोनेगाव रोड ते येडशी बसस्थानकाचे अंतर दीड किलोमीटरपेक्षा जास्त आहे. अंधारात हे अंतर चालत जावे लागल्याने कांबळेंना शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. त्यातच कळंबला जाणारी ६.३० वाजताची सेटल गाडी सुटली, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र टमटम रिक्षा करून गावी जावे लागले. यामुळे आर्थिक नुकसानही झाले.

कांबळे यांनी तक्रारीत येडशी बसस्थानकाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे गाव धुळे-सोलापूर आणि लातूर-पुणे या प्रमुख महामार्गांवर आहे. येथून दररोज असंख्य एसटी बस प्रवाशांची ने-आण करतात. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील बससुद्धा रात्री-अपरात्री येथे थांबतात. असे असतानाही “जादा” बस येडशी स्टँडला का जात नाही? चालक-वाहकांना प्रवाशांना नाकारण्याचा अधिकार आहे का? ज्येष्ठ नागरिकांना अंधारात निर्जन ठिकाणी सोडणे हे बेकायदेशीर, अमानुष आणि संतापजनक नाही का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी संबंधित लोकसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई मागितली.

या तक्रारीवर अंबड आगाराने तातडीने कारवाई केली. ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रात आगार प्रमुखांनी कांबळेंना कळवले की, चालक द.अ. जाधव (क्र. ४७७) आणि वाहक म.अं. वाल्हेकर (क्र. ८९७८) यांच्यावर अनुक्रमे अपराध प्रकरण क्र. ६०/२५ आणि ६१/२५ अंतर्गत रा.प. शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

या घटनेमुळे एसटीच्या चालक-वाहकांच्या मनमानीला चाप बसण्याची अपेक्षा आहे. अनेकदा अधिकृत थांब्यांवर बस न थांबवल्याने प्रवाशांना त्रास होतो, पण तक्रारी नसल्याने कारवाई होत नाही. कांबळेंच्या तक्रारीने एक उदाहरण घालून दिले आहे. आता इतर प्रवासीही तक्रारी दाखल करतील आणि एसटी महामंडळ अधिक जबाबदार होईल, अशी आशा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महामंडळाने कठोर धोरण अवलंबावे, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here