पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

0
59

धाराशिव : पेट्रोल पंपातून पाणीमिश्रित डिझेल दिल्याने वाहनाचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार मुकुंद पि. बाळासाहेब माढेकर (वय ३६, रा. रामनगर, उस्मानाबाद) यांनी उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पाणी मिश्रित डिझेलमुळे त्यांच्या चारचाकी वाहनाचे इंजिन बंद पडले, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती खर्च करावा लागला, असा आरोप करण्यात आला होता.

२३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री डिझेल भरल्यानंतर काही अंतरावरच गाडी बंद पडल्याचे तक्रारदाराने सांगितले. पुढील दिवशी वाहन टोईंगसाठी ४,००० रुपये, दुरुस्तीकरिता २,६९१ रुपये आणि पुढील तपासणी व अंदाजित दुरुस्तीमध्ये तब्बल १.२५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे जॉबकार्डमध्ये नमूद करण्यात आले होते. चव्हाण मोटर्स आणि सोलापूर वर्कशॉपच्या अहवालात स्पष्टपणे “पाणीमिश्रित डिझेलमुळे इंजिन नॉकिंग” असल्याचे उल्लेख आढळले.

सामनेवाले पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आरोप नाकारले असले तरी, आयोगाने पुराव्यांच्या आधारे सेवा त्रुटी अंशतः सिद्ध झाल्याचे नमूद केले. इंधन पावती, अधिकृत सर्विस केंद्राचा अहवाल आणि घटनाक्रमातील सुसूत्रता लक्षात घेऊन आयोगाने तक्रारदारास नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरवले.

या प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष प्रज्ञा हेंढे आणि सदस्य वैशाली बोराडे यांनी केली. जवळपास ३ वर्षे ३ महिने ९ दिवस सुनावणी चालल्यानंतर हा निर्णायक आदेश पारित करण्यात आला.

का आहे हा निकाल महत्त्वाचा?

  • पाणीमिश्रित इंधनप्रकरणी ग्राहकाची बाजू सिद्ध होण्याचे दुर्मिळ उदाहरण
  • अधिकृत सर्व्हिस सेंटरचे जॉबकार्ड निर्णायक पुरावा
  • पेट्रोल पंपांच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि इंधन वितरणातील गुणवत्ता राखण्यासाठी आयोगाचा हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे कायदेविषयक तज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here