भूम प्रतिनिधी :- शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालयासमोरील तीव्र उतार पुन्हा एकदा अपघातास कारणीभूत ठरला आहे. शनिवारी (दि. २०) सकाळी आणि दुपारी केवळ काही तासांच्या अंतराने ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पलटी झाल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही अपघातांत ट्रॅक्टरसह एका चारचाकी कारचे, दुचाकी बुलेटचे तसेच संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा ऊस ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २५ ए.डब्ल्यू. ३६५२ व एम.एच. १३ बी.आर. ३१६ द्वारे महाविद्यालयाच्या रस्त्याने वाहतूक केली जात होती. सकाळी अंदाजे ११ वाजता पहिला ट्रॅक्टर उतारावरून वेगाने उतरत असताना समोर अचानक आलेल्या दुचाकीला वाचविताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात रस्त्यालगत असलेले अमर जमादार यांचे ‘ए. जे. मोटर्स’ दुकान आणि दुकाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचा थोडक्यात बचाव झाला.
दरम्यान, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी ऊस वाहतूक करणारा दुसरा ट्रॅक्टरही पलटी झाला. या अपघातात एका चारचाकी कारचे व बुलेटचे मोठे नुकसान झाले.
एकाच दिवशी दोन अपघात घडल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महाविद्यालयासमोरील उतारावर गतिरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नाही आणि त्यामुळेच वारंवार अपघात होतात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ठिकाणी तातडीने गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग उभारावे, अशी जोरदार मागणी होत असून महाविद्यालय प्रशासनाने यासंदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!
