लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

0
31

ड्रग्स प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र

धाराशिव – तुळजापूर शहरात गाजत असलेल्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असून मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, या सगळ्या काळात वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांना बदली न करता मुदतवाढ देण्यात आली. “ज्याच्या कार्यकाळात ड्रग्जचा सुळसुळाट झाला, त्याच अधिकाऱ्याकडे तपास ठेवणे म्हणजे लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखे आहे,” अशा शब्दांत खासदारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

खासदार राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ९ सप्टेंबर रोजी थेट पत्र पाठवून या मुदतवाढीला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यात त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील कारवाईतील त्रुटींवर बोट ठेवले असून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

राजेनिंबाळकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, ड्रग्ज रॅकेटमधील अनेक आरोपींना जामीन मिळाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. याउलट, आरोपींपैकी एका व्यक्तीचा राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सत्कार केल्याची गंभीर बाब त्यांनी उघड केली. त्यामुळे सरकारची नीयत संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

खासदारांच्या चार प्रमुख मागण्या

  1. ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करून मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी.
  2. आरोपीचा सत्कार करणाऱ्या मंत्र्यांवर नैतिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.
  3. डीवायएसपी निलेश देशमुख यांना दिलेली मुदतवाढ रद्द करून त्यांची बदली करावी.
  4. संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि उच्चस्तरीय यंत्रणेकडे सोपवावा.

राजकीय भेद विसरून या गंभीर प्रकरणात कठोर आणि निःपक्ष कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा राजकीय व प्रशासनिक गुंता आणखी गडद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here