अबब… डॉक्टरांचे पथक आले तपासणी करून ट्रॅक्टरने गेले नागपूरला!

0
271

प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार बोगस बिलांच्या आजारावर आरोग्य विभाग उपचार करणार का?

धाराशिव : आरोग्य विभागातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणारा आणि प्रशासनालाच हादरा देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरहून NQAS (नॅशनल कॉलिटी ऍश्युरन्स स्टॅंडर्ड) तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने तपासणी पूर्ण केल्यानंतर जातेवेळी नागपूरला परत जाण्यासाठी MH 24 D 4011 या लातूर जिल्ह्यात नोंद असलेल्या ट्रॅक्टरने प्रवास केला, अशी नोंद अधिकृत बिलांमध्ये असल्याचा सनसनाटी आरोप नागरिक आकाश लहु खंडागळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारीनुसार उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत सत्यदेव कापसे, कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील करूंडवाडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगा मुधोळकर यांनी संगनमत करून तपासणी दौऱ्याच्या वाहनभाडे, निवास व भोजन या नावाखाली बनावट पावत्या सादर करून हजारो रुपयांचा अपहार केला.

विशेष म्हणजे केशेगाव–नागपूर असा शेकडो किलोमीटरचा परतीचा प्रवास ट्रॅक्टरने केला, असे रसिदीत दाखवण्यात आले असून या नोंदीवरूनच गैरव्यवहाराचा संशय आणखी दृढ झाला आहे.

ट्रॅक्टरचा MH 24 D 4011 हा नंबर लातूर जिल्ह्यातील असूनही नागपूरच्या ‘ओंकार मल्टीसर्व्हिसेस’ या परिवहनदाराकडून 6,875 रुपयांचे वाहनभाडे बिल सादर करण्यात आले.
“तपासणी करायला डॉक्टरांचे पथक आले… आणि तपासणी करून ट्रॅक्टरने नागपूरला परत गेले म्हणे! ही तर थेट जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे,” असा आरोप तक्रारदाराने केला.

तक्रारीत असेही नमूद आहे की—

  • निवास–भोजनासाठी 9,224 रुपये,
  • डॉ. कापसे यांच्या खात्यात 13,875 रुपये,
  • तर डॉ. करूंडवाडे यांच्या खात्यात 7,754 रुपये जमा झाले.

ही सर्व बिले कृत्रिमरीत्या तयार करण्यात आली असून या प्रक्रियेत डॉ. गंगा मुधोळकर यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप आहे.

लांबचा नागपूरचा प्रवास परतीसाठी ट्रॅक्टर दाखवणे, त्यासाठी खाजगी सेवा पुरवठादाराचे पावतीपत्र जोडणे, आणि खर्चाचे फुगवलेले आकडे — या सर्वामुळे संपूर्ण व्यवहार अत्यंत संशयास्पद असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. “हा प्रकार केवळ बनावट पावत्यांपुरता मर्यादित नसून आरोग्य विभागातील आणखी मोठ्या आर्थिक अनियमिततांची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगावचे लेखापरीक्षण करून सर्व व्यवहारांची चौकशी व्हावी,” अशी मागणीही खंडागळे यांनी केली आहे.

या गंभीर आरोपांबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास यांना विचारले असता त्यांनी दैनिक जनमतशी बोलताना,
“तक्रार प्राप्त झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल,”
अशी अधिकृत प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here