रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट

0
99


मुंबई | प्रतिनिधी
खासदार रामदास आठवले यांची लढवय्या, संघर्षशील आणि पॅंथर चळवळीतील भूमिका झाकोळून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा ‘विनोदी शीघ्रकवी’ म्हणून उभी केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केला आहे.
रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या दीर्घ फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सोशल मीडियावरील एका ठराविक वर्गावर आणि संघ–भाजपाच्या राजकीय कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले आहे.

Damage – Hope – Practice हेच सूत्र


प्रा. अंधारे यांनी म्हटले आहे की, जसे काँग्रेसच्या गांधी–नेहरू मॉडेलला डॅमेज करून ‘७० वर्षांत काहीच झालं नाही’ असा प्रचार केला गेला, त्यानंतर ‘अच्छे दिन’चे होप दाखवून मोदींना आयकॉन म्हणून पुढे आणले गेले, तशीच कार्यपद्धती आंबेडकरी चळवळीबाबतही राबवली गेली.
“पॅंथर चळवळीतून उभे राहिलेले नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे आणि रामदास आठवले हे आयकॉन्स आधी Destroy केले गेले. अनुयायांकडूनच त्यांची खिल्ली उडवली जावी, अशी पद्धतशीर प्रक्रिया राबवण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.

आठवले यांनी अनेक लढवय्ये कार्यकर्ते घडवले


महाराष्ट्रातील अनेक लढवय्ये चेहरे उभे करण्याचे काम रामदास आठवले यांनी केले असल्याचे प्रा. अंधारे यांनी स्पष्टपणे नमूद केले. सोलापूरचे राजाबाबू सरवदे, सातारचे अशोक बापू गायकवाड, जगदीश गायकवाड, परशुराम वाडेकर, साधू कटके, चंद्रकांता सोनकांबळे यांसारखी अनेक नावे त्यांनी उदाहरणादाखल दिली.
“दुर्दैवाने आठवले साहेबांना ना स्वतःचे मार्केटिंग करता आले, ना आयटी सेल उभा करता आला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

खैरलांजी प्रकरणानंतरचा अनुभव मांडला


खैरलांजी घटनेनंतर आपल्यावर दाखल झालेल्या अनेक खोट्या केसेसच्या संदर्भात प्रा. अंधारे यांनी वैयक्तिक अनुभवही मांडला. नामदेव ढसाळ यांच्या माध्यमातून विषय लक्षात येताच, रामदास आठवले यांनी थेट तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून संरक्षण दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
“‘सुषमा चळवळीची असेट आहे, तिला संपवण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही,’ हे आठवले साहेबांनी अत्यंत ठामपणे मांडले,” असे त्यांनी लिहिले.
‘जेवलास का?’ विचारणारे पॅंथर उरले नाहीत
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियासारख्या दूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांना ‘जेवलास का?’ आणि ‘परतीच्या तिकिटाचे पैसे आहेत का?’ असे विचारणारे पॅंथर आता दुर्मिळ झाले असल्याचे सांगत, ही आपुलकी आठवले साहेबांना वेगळे ठरवते, असे त्यांनी नमूद केले.

भाजपसोबतच्या मैत्रीवर मतभेद, पण…


रामदास आठवले यांच्या भाजपसोबतच्या राजकीय मैत्रीबाबत मतभेद असल्याचे मान्य करतानाच, “आदर्शवादी भाषा करून विश्वासघात करणाऱ्यांपेक्षा वास्तववादी भूमिका घेणारे लोक श्रेष्ठ,” असे मत प्रा. अंधारे यांनी व्यक्त केले.
‘माणूस जिवंत असतानाच जपा’
“माणूस गेल्यावर कौतुक करण्यापेक्षा तो जिवंत असताना जपणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या शुभेच्छांवरूनही काहींना त्रास होईल, अशी टिपण्णी करत त्यांनी टीकाकारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here