तेर मध्ये आम आदमी फोडतोय प्रस्थापितांना घाम!

0
144

तेर गटातून आम आदमी पार्टीच्या रत्नमाला पिंपळे यांनी उमेदवारी दाखल करताच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांना गावागावातून मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून, त्यामुळे तेर गटातील प्रस्थापित राजकीय समीकरणे अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.

सामाजिक कामांच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या रत्नमाला पिंपळे यांची ओळख हळूहळू प्रभावी उमेदवार म्हणून होत आहे. त्यांचे पती तानाजी पिंपळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, शिक्षण, पर्यावरण आणि जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. लहान मुलांसाठी शैक्षणिक संकुल उभारणीचा पुढाकार, तेर येथील घाट परिसरात स्वच्छता मोहीम, तसेच सुमारे दोन हजार झाडांचे वृक्षसंवर्धन करून पर्यावरणपूरक विकासाचा संदेश त्यांनी दिला आहे.

शेतकरी प्रश्नांवरही रत्नमाला पिंपळे आक्रमक भूमिका घेताना दिसल्या आहेत. ऊस बिलाच्या थकबाकीविरोधात आंदोलन करून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढा दिला. त्याचबरोबर गरीब व होतकरू मुलींसाठी सायकल वाटप, महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, तसेच बचत गटातील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही पिंपळे कुटुंबाची भूमिका ठळक राहिली आहे. तानाजी पिंपळे हे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असून, आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे आरक्षण, शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून रत्नमाला पिंपळे यांची ओळख तयार होत आहे.

‘राजकारण म्हणजे सेवा’ या आम आदमी पार्टीच्या भूमिकेचा पुरस्कार करत रत्नमाला पिंपळे यांनी तेर गटात स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात तेर गटातील निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता असून, ‘आप’च्या या उमेदवारामुळे विरोधकांना खरोखरच घाम फुटणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here