सहा महिन्यांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ‘मस्तान भाई’ परंड्यात जेरबंद

0
115

परंडा पोलिसांची मोठी कारवाई


अंमली पदार्थ रॅकेटचा ‘मुख्य पुरवठादार’ गजाआड; गुन्हेगारी जगतात खळबळ

परंडा (दि. ११ ऑक्टोबर):
अंमली पदार्थ तस्करी (ड्रग्ज रॅकेट) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गेल्या सहा महिन्यांपासून बार्शी व सोलापूर पोलिसांना गुंगारा देणारा फिरोज उर्फ मस्तान शेख याला परंडा पोलिसांनी पकडण्यात मोठे यश मिळविले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्ज रॅकेटमधील मुख्य पुरवठादार अटकेत आल्यानंतर गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

फिरोज उर्फ मस्तान शेख हा एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार होता. शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस फौजदार गजानन मुळे आणि पोलिस अंमलदार राहुल खताळ हे शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले असता, रुग्णालय परिसरातील गोल्डन चौक येथे त्यांना हा फरार आरोपी दिसला.

बार्शी आणि सोलापूर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद असलेला आणि अत्यंत चलाखीने पोलिसांपासून लपत असलेला मस्तान दिसताच, सहाय्यक फौजदार गजानन मुळे आणि अंमलदार राहुल खताळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने फिरोज उर्फ मस्तान शेख यास अटक करून परंडा पोलिस ठाण्यात आणले.

अटकेनंतर तात्काळ सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला या घटनेची माहिती देण्यात आली. शनिवारी सकाळी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

मस्तान शेख हा अंमली पदार्थ तस्करीतील मुख्य पुरवठादार असून, तो इतर राज्यांतून ड्रग्ज आणून परंडा परिसरातून इतर डिलर्स व किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाकणीजवळ झालेल्या १८ ग्रॅम ड्रग्ज कारवाईत मस्तानचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते. बार्शी येथील गुन्ह्यात फरार असतानाही त्याने ड्रग्ज तस्करी सुरूच ठेवली होती.

या अवैध धंद्यातून फिरोजने मोठी संपत्ती जमवून परंडा शहरात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. किरकोळ कारणांवरून त्याने परंडा शहरातील मुख्य चौकात दोन वेळा हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची माहिती आहे. मात्र, या फायरिंग प्रकरणी पोलिसात कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही, असे सांगण्यात आले. मस्तानच्या अटकेनंतर शहरातील अवैध धंदे आणि दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक अधिक वाढणार आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांनी केले पोलिसांचे विशेष कौतुक

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनिल चोरमले यांनी परंडा पोलिस ठाण्यात भेट देऊन सहाय्यक पोलिस फौजदार गजानन मुळे आणि पोलिस अंमलदार राहुल खताळ यांच्या सतर्कतेचे व धाडसाचे विशेष कौतुक केले.

या कारवाईत पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब खरात, सहाय्यक पोलिस फौजदार गजानन मुळे, पोलिस अंमलदार राहुल खताळ, शिंदे आणि शिवाजी राऊत आदींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here