बाजीराव उद्धव भराटे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला अखेर यश
वाशी (राहुल शेळके): वाशी तालुक्यातील सर्वात मोठी, सतत चर्चेत असणारी आणि वादग्रस्त ग्रामपंचायत — पारा ग्रामपंचायत — येथील भ्रष्टाचार अखेर उघड झाला आहे. राजकीय वरदहस्तामुळे सतत कारवाईतून बचावत आलेले सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण देशमुख यांना अखेर शासन खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर (भाप्रसे), छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे वाशी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, तालुक्यातील ज्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी अपहार केलेला आहे, त्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारा येथील वादी बाजीराव उद्धव भराटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी केली असता खालीलप्रमाणे अनियमितता आढळून आली:
- वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेची रक्कम रुपये 2,33,000/-
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजना रक्कम रुपये 60,000/-
- ग्रामनिधी खात्यावरील रक्कम रुपये 43,000/-
अशा प्रकारे एकूण रुपये 3,36,000/- इतकी रक्कम सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अनियमित पद्धतीने वापरल्याचे दिसून आले.
सदर दोघांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेमधील वित्तीय नियमांचे उल्लंघन केले असून, विकास कामे व साहित्य खरेदी करताना शासनाने ठरविलेल्या प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणीचे नियम पाळले नाहीत. देयकांमधील शासकीय कपातीसंदर्भातही आवश्यक कार्यवाही झाल्याचे नोंदीत दिसून आले नाही. त्यामुळे सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद आणि ग्रामविकास अधिकारी हे प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे सरपंच राजेंद्र काशीद यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली. या संदर्भातील सुनावण्या दि. 6/1/24, दि. 11/12/24, आणि दि. 13/5/25 रोजी घेण्यात आल्या. त्या वेळी प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती वाशीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एस. राठोड, विस्तार अधिकारी (पं.) व्ही. बी. रूपवट, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी पी. बी. देशमुख, आणि कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी ए. बी. शेख उपस्थित होते.
पुढील सुनावणीच्या तारखा 24/6/25, 15/7/25, 29/7/25, आणि 12/8/25 रोजी ठरवण्यात आल्या होत्या. अखेर दि. 30/9/25 रोजी खालीलप्रमाणे निर्णय देण्यात आला:
- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांचा अहवाल (जा. क्र. जि. प. धा./सा. प्र. वि./2/ग्रा. प. वि.8/सीआर-ई-855774/कावि/56/2024, दि. 28/1/2025) मान्य करण्यात येतो.
- गैरअर्जदार राजेंद्र पांडुरंग काशीद, सरपंच, ग्रामपंचायत पारा, ता. वाशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात येत आहे.
- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी अहवालाच्या अनुषंगाने अपहारित रक्कम निश्चित करण्यासाठी विशेष समिती गठित करून ती शासन खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. तसेच रक्कम वसूल न झाल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर (उदा. 7/12 नोंदणीवर) अपहारित रकमेचा बोजा टाकण्याची कार्यवाही करावी.
असे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर (भाप्रसे), छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी दिले आहेत. आता या आदेशाची अंमलबजावणी करून सरपंच राजेंद्र काशीद यांच्या कडील अपहारित रक्कम कशी आणि किती दिवसात वसूल केली जाते, तसेच ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव कोणती कार्यवाही करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- मोटारसायकल चोर टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात – चार चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी पकडले
- पारा येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हडप केलेली रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
- रस्ते कामाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमा,नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशींवर प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
