Home Blog Page 12

दारूच्या नशेत पोलीस ठाण्याच्या काचेवर दगडफेक

धाराशिव – धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत एका इसमाने काचेवर दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी पोलीस हवालदार संतोष रामराजे पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ९ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत ते पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून पोअं/९१९ डी.बी. झोरी व वायरलेस ड्युटीसाठी पोअं/६६८ चव्हाण हेही ड्युटीवर होते.

रात्री १०.५२ वाजता तक्रारदार सुलताना हबीब निचलकर यांची तक्रार नोंदवित असताना, एक इसम दारूच्या नशेत येऊन अंमलदार कक्षाच्या काचेवर दगड मारून काच फोडली. बाहेर येऊन पाहणी केली असता, त्याचे नाव प्रदीप श्रीमंत लोखंडे (वय ४२, रा. तुळजापुरनाका, धाराशिव) असे समजले. आरोपीच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत होता. चौकशीत त्याने आपल्या गल्लीत भांडण झाल्याचे व लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व हातापायावर किरकोळ जखमा होत्या.

घटनेची माहिती बीट मार्शल पोलिसांना दिल्यानंतर पोअं/११०१ भोसले व पोअं/१७०० घुगे घटनास्थळी आले. लोखंडे याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३(१) व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जिल्हाधिकारी कार्यालयाचीच केराची टोपली; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच लावले अवैध बॅनर

धाराशिव – जिल्हाधिकाऱ्यांनी एखादा आदेश अथवा सूचना काढल्यास त्याचे पालन सर्व शासकीय यंत्रणांनी करणे अपेक्षित असते. मात्र, धाराशिव जिल्ह्यात उलट चित्र दिसून आले आहे. स्वतःच्या आदेशाचे पालन खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयानेच न केल्याची घटना उघड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना व नगरपंचायतींना अवैध बॅनरांवर लगाम घालण्यासाठी कठोर सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार, शहरातील प्रत्येक बॅनरवर QR कोड असणे बंधनकारक करण्यात आले होते, ज्यामुळे बॅनर लावणाऱ्यांची ओळख व वैधता त्वरित तपासता येईल.

परंतु, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच लावण्यात आलेल्या एका बॅनरवर QR कोड नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा बॅनर वैध आहे की अवैध, हा प्रश्न निर्माण झाला असून, नियमभंगाचे हे उदाहरण खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरात बॅनर आणि होर्डिंग लावण्यासाठी ठराविक वेळ, ठिकाण आणि आकारमानाचे निकष निश्चित आहेत. त्याबाबत कर आकारणीची स्पष्ट तरतूद असून, या माध्यमातून नगरपालिकेला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. परंतु, प्रत्यक्षात हे निकष पाळणे टाळले जात असल्याने अवैध बॅनर लावण्याचे प्रकार वाढले आहेत. धाराशिव शहरात, विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत, बॅनर सर्रासपणे लावले जातात. यामुळे केवळ शहराचे सौंदर्य बिघडत नाही, तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वेळा बॅनरमुळे दृष्टी आड झाल्याने किरकोळ अपघातांच्याही घटना घडल्या आहेत.

नगरपालिकेने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक असतानाच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच नियमभंग करणारा बॅनर लावला जाणे, ही बाब दुर्दैवी आणि लाजिरवाणी मानली जात आहे. नागरिकांचा प्रश्न आहे की, या बॅनरच्या वैधतेबाबत नगरपालिका स्पष्ट भूमिका घेणार का? की नेहमीप्रमाणेच चुकीकडे दुर्लक्ष करून ‘मूकसंमती’ दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाहणीला आले आणि उद्घाटन करून गेले 

जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पडसाळी पंपगृह पूजन करून उद्घाटन

पडसाळी पंपगृहाच्या कामाची अधिकाऱ्याकडून घेतली सविस्तर माहिती

सोलापूर, दिनांक 11 : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प योजना क्रमांक दोन अंतर्गत पडसाळी येथे उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाचे पूजन व उद्घाटन जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पंपगृहाच्या कामाची सखोल माहिती घेऊन पाहणी केली.

या प्रसंगी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजीतसिंह  पाटील, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, कार्यकारी अभियंता अमोल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी प्रथम सिंचन प्रकल्पाच्या कामांची सविस्तर पाहणी केली. कृष्णा मराठवाडा योजनेतील टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पडसाळी येथे उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाचे पूजन विधिवत पार पडले. यानंतर प्रकल्पाच्या कार्यपद्धती, प्रगती आणि भविष्यातील लाभधारक क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर व भरपूर पाणी मिळणार असून, शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

पाहणीला आले आणि उद्घाटन करून गेले

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मराठवाड्यासाठी महत्वाची आहे मात्र या योजनेचे भिजत घोंगडे कायम आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी निवडणुकीपूर्वी पाणी येईल असे सांगितले होते मात्र अद्याप धाराशिव जिल्ह्यात पाणी आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका आता तोंडावर असल्याने पाण्याबद्दल विचारणा होणार यामुळेच जलसंपदा मंत्र्याच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी येथील पंपगृहाचे उद्घाटन केल्याचे बोलले जात आहे. जलसंपदा मंत्र्याच्या दौऱ्यात केवळ पाहणी असताना उद्घाटन होणे अजब असल्याचे बोलले जात आहे.

एसटी चालक-वाहकांचे 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण

मागण्या मान्य न झाल्यास सणासुदीत सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

धाराशिव –
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नाचा कणा मानल्या जाणाऱ्या चालक आणि वाहक यांच्या आगारस्तरील प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, येत्या 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या उपोषणामुळे श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या काळात एसटी सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगारातील विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी चालक-वाहकांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर केले असून, त्याची प्रत राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, विभाग नियंत्रक धाराशिव, विभागीय वाहतूक अधिकारी, कामगार अधिकारी, पोलीस निरीक्षक (आनंदनगर), विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या अशा

  1. नियमानुसार आपत्कालीन भत्ता देणे.
  2. सेवा जेष्ठतेनुसार राज्य परिवहन महामंडळात कर्तव्याचे वाटप.
  3. सेवा जेष्ठतेनुसार रोटेशन तालिका तयार करणे.
  4. मुंबई, बोरीवली, भिवंडी पायलट कर्तव्याचा संपूर्ण मोबदला नियमानुसार देणे. अन्यथा, इतर आगारांप्रमाणे ‘स्क्रू’ सुविधा उपलब्ध करणे.

या मागण्यांसह आणखी काही मागण्या उपोषणाच्या निवेदनात समाविष्ट आहेत. “मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी न झाल्यास 15 ऑगस्टपासून आम्ही आमरण उपोषणास बसू”, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

निवेदनावर वाहक ए. डी. शिरसकर, चालक एल. बी. सय्यद, वाहक के. बी. गायकवाड, चालक व्हि. टी. मुंडे, चालक एन. व्ही. रपकाळ, चालक जी. के. कात्रे, वाहक सौ. एम. एस. राऊत यांच्यासह एकूण 53 चालक-वाहकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये पुढील काही दिवसांत आणखी कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटीचे चालक आणि वाहक हे प्रवासी वाहतुकीचे थेट चालक घटक असल्याने, त्यांच्या संपाचा परिणाम थेट गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. त्यामुळे उपोषणाची अंमलबजावणी झाल्यास, सणासुदीच्या काळात प्रवाशांना गैरसोयीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


देशभरात दोन मोठ्या आंदोलनांचा बिगुल — मुंबईत शिवसेनेचे ‘जनआक्रोश’, दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा

मुंबई / नवी दिल्ली — देशाच्या राजधानी आणि आर्थिक राजधानीत आज दोन महत्त्वपूर्ण राजकीय आंदोलनांचे वातावरण तापले आहे. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने ‘जनआक्रोश आंदोलन’ाची हाक दिली असून, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा निघणार आहे.


मुंबईत ‘जनआक्रोश आंदोलन’

देशाची आर्थिक राजधानी देखील आंदोलनाने ढवळून निघणार असून मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 वाजल्यानंतर हे आंदोलन होणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहणार असून, या आंदोलनात केवळ शिवसैनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाकरे गटाने महायुती सरकारवर तीव्र आरोप करत, भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा मुद्दा उचलून धरला आहे. अलीकडेच ‘हनीट्रॅप’सह विविध भ्रष्टाचार प्रकरणांमुळे महायुतीतील काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मुख्य मागणी ठाकरे गटाची आहे.

उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, “सरकारने अशा मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी कायद्याच्या कक्षेत कारवाई केली पाहिजे. अन्यथा राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढेल.” या पार्श्वभूमीवर आज फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.


दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा

दुसरीकडे, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व खासदार आज एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मतांची चोरी’ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने आयोगावर थेट दबाव आणण्याचे धोरण आखले आहे.

विरोधी पक्षातील खासदारांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने मतमोजणीत पारदर्शकता राखली नाही आणि निष्पक्षपणे काम करण्यात अपयश आले. यामुळे मतमोजणी प्रक्रियेत फेरफार होऊन सत्ताधारी पक्षाला लाभ मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात आयोगाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

आयोगाकडून विरोधी खासदारांना भेटण्यासाठी दुपारी 12 वाजता वेळ देण्यात आली असून, एकूण 30 जणांच्या प्रतिनिधीमंडळाला प्रवेशाची परवानगी दिली आहे. या भेटीत आंदोलनाचे निवेदन अधिकृतरीत्या आयोगाला सादर केले जाणार आहे.


आजच्या या दोन आंदोलनांकडे देशभराचे लक्ष लागले आहे. एकीकडे मुंबईत राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेचे रस्त्यावर उतरलेले आंदोलन आणि दुसरीकडे दिल्लीत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा विरोधी पक्षांचा मोर्चा — या दोन्ही घडामोडी आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात.

येडशीमध्ये हजरत जमादार बाबा रहे ऊरूसास उद्यापासून सुरुवात

येडशी (ता. धाराशिव) येथे हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाचा तीन दिवसीय भव्य सोहळा उद्या 11 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवासाठी जिल्ह्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानुसार, 11 ऑगस्ट रोजी संदल मिरवणूक, 12 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, तर 13 ऑगस्ट रोजी जियारत व महाप्रसाद होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून 12 ऑगस्ट रोजी कव्वालीची मैफल रंगणार असून, पुण्यातील प्रख्यात कव्वाल परविन काचवाली आणि हैदर नाझाँ यांच्या जुगलबंदीचा मुकाबला भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहे.

दर्गाह परिसरात भक्तीचा दरबार सजविण्यात येणार असून, सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊरूस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री सिद्धिविनायक परिवारातील दोन्ही कारखान्याचा रोलर पूजन सोहळा उत्साहात

शेतकरी हितासाठी 200 रुपयांचा अंतिम हप्ता देण्याची घोषणा

धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. 1 आणि खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. 2 या दोन्ही गुळ कारखान्यांच्या 2025-26 गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (दि. 10) पारंपरिक रोलर पूजनाने झाला. संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सहकुटुंब धार्मिक विधीपूर्वक पूजन करण्यात आले.

या प्रसंगी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ तसेच श्री सिद्धिविनायक परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील चार-पाच वर्षांपासून ऊस गाळप व्यवसायात सातत्य राखत असलेल्या या दोन्ही युनिट्सबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास दृढ झाला आहे. मागील हंगामात सुमारे 2.25 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. यंदा तीन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रतिदिन तीन हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे नियोजन असल्याची माहिती दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देत जलद पेमेंट पद्धत राबवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस खरेदी झाल्यानंतर अवघ्या 15 ते 45 दिवसांत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तसेच, हंगाम 2024-25 मधील उर्वरित ऊस बिलाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता बैलपोळ्याच्या सणानिमित्त देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

या कार्यक्रमाला श्री. दिनेश कुलकर्णी, श्री. गणेश कामटे, श्री. बालाजी कोरे, श्री. राजकुमार जाधव, श्री. अरविंद गोरे, श्री. देविदास कुलकर्णी, श्री. गजानन पाटील, श्री. मंगेश कुलकर्णी, श्री. विकास उबाळे, श्री. अभय शिंदे, श्री. बालाजी जमाले, श्री. संजीव शिलवंत, श्री. मकरंद ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रतीक देवळे यांनी केले.

येडशी उड्डाणपुलाजवळ तरुणाला बेदम मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव, 10 ऑगस्ट 2025: धाराशिव तालुक्यातील येडशी गावाजवळ उड्डाणपुलावर 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेचा तपशील:
फिर्यादी अविनाश हरीदास मोराळे (वय 23, रा. वडजी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते येडशी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ असताना आरोपी विक्की चव्हाण, स्वप्नील पौळ, यश माने (सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी), सूरज अवधूत (रा. अवधूत वाडी, ता. वाशी) आणि पांडू जाधवर (रा. रत्नापूर, ता. वाशी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी अविनाश यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी रॉडने त्यांना गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे, तर आरोपींनी अविनाश यांना जिवे मारण्याची धमकीही दिली.

पोलीस कारवाई:
या घटनेनंतर अविनाश मोराळे यांनी 9 ऑगस्ट 2025 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (भादंवि) कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये मारहाण, जिवे मारण्याची धमकी, गैरकायद्याची मंडळी जमवणे आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. नागरिकांना अशा घटनांबाबत सतर्क राहण्याचे आणि काही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या प्रकरणात पुढील तपासात काय उघडकीस येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यात खुनाच्या दोन धक्कादायक घटना; ढोकी आणि उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

धाराशिव, दि. १० ऑगस्ट २०२५: धाराशिव जिल्ह्यात खुनाच्या दोन गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. एक घटना ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, तर दुसरी उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

ढोकीत वडिलांचा खून: ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, पळसप येथे दि. ३१ जुलै २०२५ रोजी रात्री १०:४५ वाजता वैभव चंद्रकांत लाकाळ याने आपल्या वडिलांवर, चंद्रकांत मदन लाकाळ (वय ६५) यांच्यावर खोऱ्याच्या दांड्याने हल्ला करून त्यांचा खून केला. रामपाल महाराज यांची भक्ती न करण्याबाबत बोलण्याच्या किरकोळ कारणावरून हा हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत यांचा मृत्यू झाला. मृताच्या मुलाने, प्रमोद चंद्रकांत लाकाळ (वय २९) यांनी दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी भा.दं.वि. १०३(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरग्यात तरुणाची हत्या: उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, दि. २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:०० ते दि. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:३० या कालावधीत, बायपास रोडलगत अंकुश शिंदे यांच्या शेताजवळ अभिषेक कालिदास शिंदे (वय २३, रा. मुन्शी प्लॉट, उमरगा) याचा खून झाला. आरोपी सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि नीता जाधव (सर्व रा. उमरगा) यांनी संगनमताने हा खून केल्याचा आरोप आहे. अभिषेकचे वडील कालिदास संभाजी शिंदे (वय ५४) यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी भा.दं.वि. १०३(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांचा तपास सुरू: या दोन्ही घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या खुनांच्या मागील नेमके कारण आणि परिस्थिती यांचा शोध घेण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणांना प्राधान्य देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

धाराशिव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर भीषण अपघात एकाचा मृत्यू

धाराशिव (१० ऑगस्ट २०२५) : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु येथील सिद्धार्थ भालचंद्र कठारे (वय अंदाजे २७) यांचा धाराशिव शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर, सिद्धाई मंगल कार्यालयासमोर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून, सतत वाहतुकीचा मोठा दबाव असतो.

सिद्धार्थ हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) धाराशिव तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे यांचे पुत्र होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजता दुचाकी (क्र. एमएच २५ ईएक्स ६७६९) वरून जात असताना ट्रक चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

अपघातग्रस्त ठिकाणी अनेक दिवसांपासून सर्व्हिस रोडचे अर्धवट काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चढउतार व खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनचालक हे टाळण्याच्या प्रयत्नात वाहनांवरील नियंत्रण गमावतात, तर सतत वाहने एकाच दिशेने वळवल्याने खड्ड्यांची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.