हायवेवरुन जाणाऱ्या वाहनावर चढुन चोऱ्या करणाऱ्या टोळीस  स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

0
24

धाराशिव : जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत सहा सराईत दरोडेखोरांना जेरबंद केले. हे आरोपी हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर चढून मालाची चोरी करत होते. शनिवारी (दि. ८ सप्टेंबर) हेच आरोपी येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत तब्बल ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींपैकी तिघांवर पुण्यातील ५० लाखांच्या दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाढली खबरदारी
तेरखेडा येथे हायवेवरून जाणाऱ्या ट्रकवर काही चोरटे चढून माल लुटत असल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत  पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी स्थानिक गुन्हे शाखेला शोधमोहीमेचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गस्तीस रवाना झाले.

गोपनीय माहिती आणि कारवाई
येरमाळा येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पाटी ते येडेश्वरी मंदिर रस्त्यावर एक स्कॉर्पिओ गाडीत संशयित थांबले होते. ते भाविकांची वाहने आडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे कळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

संध्याकाळी साधारण ५.५० वाजता पोलिसांनी कारवाई केली असता दोन आरोपी गाडीतून उतरून पळण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. उर्वरित आरोपींना गाडीतूनच ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

  1. अमोल नाना काळे (२८)
  2. किरण बापु पवार (२५)
  3. दत्ता दादा काळे (२१)
  4. गणेश नाना काळे (३२)
  5. सुभाष तानाजी काळे (२४)
  6. शिवा रामा पवार (२२)
    (सर्व राहणार तेरखेडा)

मुद्देमाल जप्त
गाडीची तपासणी केली असता दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल फोन आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालासह येरमाळा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

पुण्यातील दरोड्याशी संबंध
तपासात समोर आले की, अटक केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी व त्यांच्याकडील स्कॉर्पिओ वाहन पुणे शहरातील आंबेगाव पोस्टे हद्दीत झालेल्या तब्बल ५० लाखांच्या दरोड्याच्या गुन्ह्यात वांछित आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे पुणे पोलिसांनाही महत्त्वाचा धागा लागला आहे.

ही कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, पोना. बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, विनायक दहिहंडे व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here