27 November 2026, Fridayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
ताज्या बातम्या

दुष्काळ २०२६ मधला अन् चारा छावणीच्या चाऱ्याचा पुरवठा दर २०१९चा? अजब सरकार!

धाराशिव-सोलापूरमध्ये चारा छावण्यांना मंजुरी; सात वर्षांपूर्वीचेच दर कायम, वाढलेल्या खर्चात छावण्या चालणार कशा?

धाराशिव : राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असताना धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाच्या दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली आहे. मात्र दुष्काळ २०२६ मधला असताना चारा छावण्यांसाठी चारा पुरवठ्याचे दर २०१९ मधीलच कायम ठेवण्यात आल्याने या निर्णयाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. धाराशिव आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांत तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, राज्यातील इतर भागांतही गरजेनुसार छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या बैठकीत चारा पुरवठ्यासाठी २०१९ मध्ये लागू असलेले दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांत चारा, डिझेल, वाहतूक, मजुरी, पाणीपुरवठा, औषधोपचार आणि छावणी व्यवस्थापनाचा खर्च वाढलेला असताना जुन्याच दरात छावण्या चालविणे संबंधित संस्थांना परवडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१९ मध्ये राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. महसूल व वन विभागाच्या २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार १६ मे २०१९ पासून मोठ्या जनावरासाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरासाठी प्रतिदिन ५० रुपये असा दर अनुज्ञेय करण्यात आला होता. त्यापूर्वी मोठ्या जनावरासाठी ७० रुपये आणि लहान जनावरासाठी ३५ रुपये असा दर लागू होता.

मात्र २०१९ ते २०२६ या सात वर्षांच्या काळात इंधन, वाहतूक, मजुरी आणि चारा यांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने २०१९ मधील दरच कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रत्यक्ष बाजारभाव आणि शासकीय दर यातील तफावत किती राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे दुष्काळ २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शासनाने सुका चारा प्रति किलो कमाल १२ रुपये आणि मुरघास प्रति किलो कमाल ८ रुपये अशी स्वतंत्र आधारभूत किंमत निश्चित केली आहे. या दरात वाहतुकीचा खर्च समाविष्ट नाही. एकीकडे २०२६ साठी चाऱ्याचे नवीन खरेदी दर निश्चित केले जात असताना दुसरीकडे चारा छावण्यांसाठी २०१९ चेच दर कायम ठेवण्यात आल्याने शासनाच्या आर्थिक गणिताबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळामुळे पशुपालकांसमोर जनावरांच्या चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत चारा छावण्यांना मंजुरी मिळणे दिलासादायक असले तरी त्या प्रत्यक्षात वेळेत सुरू होणे आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

आता जिल्ह्यात नेमक्या किती चारा छावण्या सुरू केल्या जाणार, त्या कोणत्या तालुक्यांत असतील, प्रत्येक छावणीची क्षमता किती असेल, कोणत्या संस्थांना त्या चालविण्याची परवानगी दिली जाईल आणि जिल्ह्यासाठी एकूण किती निधी उपलब्ध होणार, याबाबत अद्याप सविस्तर स्थानिक आदेशाची प्रतीक्षा आहे.

दुष्काळ २०२६चा असताना चारा छावण्यांचे आर्थिक गणित मात्र २०१९च्या दरावर चालणार असेल, तर वाढलेल्या खर्चाची भरपाई कोण करणार आणि त्या दरात छावण्या प्रत्यक्षात कशा चालणार, हा मुख्य प्रश्न आता शासनासमोर उभा राहिला आहे.