मद्यप्राशन केल्याचा संशय जिल्हा परिषदेतील ९ कर्मचाऱ्यांची अचानक चाचणी

0
283

धाराशिव – जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आज सकाळी अचानक ९ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी नियमित आरोग्य तपासणी नसून थेट ब्रीद ॲनालायझर टेस्ट घेण्यात आली होती.

शिक्षण विभागात काही कर्मचारी कर्तव्यावर असतानाच मद्यप्राशन करून कार्यालयात हजर होत असल्याचा संशय व्यक्त होत होता. यामुळे कामकाजात शिस्तभंग, कुचराई व शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार संबंधित विभाग प्रमुखांकडे आली होती. अखेर विभाग प्रमुखांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आवारात येऊन संबंधित कर्मचाऱ्यांची एकामागून एक श्वासाद्वारे तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व नऊ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तथापि, शासकीय कर्तव्यावर असताना दारू सेवन करण्याची हिम्मत करणाऱ्यांना या तपासणीमुळे धडा शिकविण्यात आला आहे, असे प्रशासनातील जाणकारांचे म्हणणे आहे.

अलीकडेच परंडा तालुक्यात एका शिक्षकाने शाळेतच मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने त्याला निलंबित केले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हा परिषदेतील आजची कारवाई ही केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, “कर्तव्यावर असताना कुठलाही शासकीय कर्मचारी दारू सेवन करून आला तर त्याच्यावर कडक शिस्तभंगात्मक कारवाई होणार” असा संदेश प्रशासनाने या निमित्ताने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here