धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन

0
59

रस्त्याच्या कामाला उशिर का झाला त्यात पडायचं नाही, नार्को टेस्टबद्दल विरोधकांसोबत वन टू वन करणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – 23 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर झालेल्या 59 रस्त्यांच्या 140 कोटींच्या कामाचे कार्यारंभ आदेश अखेर निघाले असून, खड्डेमय रस्त्यांचा 18 महिन्यांचा अनुभव घेतलेल्या धाराशिवकरांना आता नव्या रस्त्यांची आशा दिसू लागली आहे. या कामाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कामाला उशीर का झाला, असा प्रश्न विचारला असता “त्यात पडायचं नाही,” असे उत्तर आमदार पाटील यांनी दिले. तर विरोधकांनी केलेल्या नार्कोटेस्टच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले, “वन टू वन करायला तयार आहे, पत्रकारांनी तेव्हा उपस्थित रहावं.”

साधारण 26 किलोमीटर लांबीचे 59 प्रमुख रस्ते आणि नाल्यांचे काम या निधीतून होणार आहे. या प्रकल्पाचा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2024 रोजी झाला होता, परंतु प्रशासकीय कारणांमुळे तो पुढे ढकलला गेला. आता वर्क ऑर्डर मंजूर झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. या निधीच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्क मंत्री जयकुमार गोरे यांचेही त्यांनी आभार मानले.

धाराशिवमध्ये तुळजापूर आणि नळदुर्गप्रमाणेच दर्जेदार रस्ते बांधले जातील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाला 18 महिन्यांची मुदत असून, उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, आमदार पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीने तीव्र प्रतिक्रिया दिली. “दिड वर्षांपासून रखडलेल्या 140 कोटींच्या रस्ते कामाचे कार्यारंभ आदेश आता काढले जात आहेत. भाजप याचा गाजावाजा करत असले तरी प्रक्रिया एवढे दिवस का थांबली, याचे उत्तर त्यांनी द्यावे,” अशी बोचरी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.https://youtu.be/AupKIDABrDo

महाविकास आघाडीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “स्वतः रस्ते कामांची अडवणूक करायची आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरु होत असल्याचा दिखावा करायचा ही राणाजगजितसिंह पाटील यांची जुनी खोड आहे. निविदा रकमेपेक्षा 22 कोटी अधिक देऊन आपल्या गुत्तेदाराला काम देण्यासाठी धाराशिवकरांना दिड वर्ष अडवून ठेवले. अखेर त्याच्याच पदरात हे काम देऊन कार्यारंभ आदेश काढले गेले. राणा पाटील यांचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे.”

आघाडीच्या नेत्यांनी पुढे म्हटले, “ही कामे सुरु व्हावीत म्हणून आम्ही आंदोलन, उपोषण, रास्ता रोको आणि पालकमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शहरवासियांच्या माथी बसणारा अतिरिक्त 22 कोटींचा बोजा वाचवण्यात आघाडीला यश आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कामे सुरु करणे क्रमप्राप्त होतेच, अन्यथा शहरात मते मागायला कोणत्या तोंडाने जायचे हा विचार करून सरकारला शहाणपण सुचले आहे.”

हे प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अय्याज शेख आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केले असून, “कारण काहीही असो, पण शहरवासियांच्या हक्काच्या रस्त्यांची कामे आता तरी तातडीने सुरु व्हावीत,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here