धाराशिव –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र या बैठकीत केवळ सात ते आठ महिला उपस्थित होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर पदे आरक्षित आहेत. विशेष म्हणजे, ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. तसेच धाराशिव नगरपालिकेचे अध्यक्षपद ‘इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला’ प्रवर्गासाठी, तर कळंब आणि भूम नगरपालिकांची अध्यक्षपदे ‘खुला प्रवर्ग महिला’ यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा आणि मुरूम या नगरपालिकांची अध्यक्षपदे सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) पुरुषांसाठी राखीव ठरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’ येणार असले तरी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत महिलांचा सहभाग नगण्य असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पक्षाकडे महिला पदाधिकारीच नसतील, तर आगामी निवडणुकीत अध्यक्षपदांसाठी महिला उमेदवार मिळतील का, हा प्रश्न या बैठकीनंतर चर्चेत आला आहे. आणि जर महिला उमेदवार मिळाल्या तरी त्या निवडून आल्या तर त्या केवळ ‘नामधारी’ राहतील, अशी टीकाही होत आहे.
या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांची उपस्थिती लक्षणीय होती, त्यामुळे सभागृहातील खुर्च्या रिकाम्या राहिल्या नाहीत.

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे शिक्षक आमदार विक्रम काळे आहेत. मात्र त्यांच्या उपस्थितीतही या बैठकीत महिलांचा सहभाग अत्यल्प होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठबळावर लढवाव्या लागतील, अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
महिला धोरणाचा पाया रचणारे शरद पवार यांच्यापासून विभक्त झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत महिलांना आता स्थान नाही का, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. पुरुषांच्या हातातच सत्तेची सूत्रे ठेवण्याचा वाढता कल हा महिलांच्या राजकीय आरक्षणासाठी आणि त्यांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी धोक्याचा संकेत मानला जात आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
