प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश

0
35

धाराशिव :
मौजे कसबे तडवळे (ता. धाराशिव) येथील गट क्रमांक ५४२ या जमिनीच्या वारसा फेरफार प्रकरणावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देणारे सुभाष मुरलीधर कदम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक, ढोकी यांना याबाबत पत्र पाठवून आवश्यक ती कारवाई करून अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मौजे कसबे तडवळे येथील गट क्रमांक ५४२ या जमिनीचे मूळ खातेदार मुरलीधर जगनाथ कदम यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नोंद करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. अर्जासोबत न्यायालयाने दिलेले वारस प्रमाणपत्रही जोडण्यात आले होते. त्यानुसार १ जुलै २०२५ रोजी वारसा रजिस्टर (६ क) मध्ये ठराव क्रमांक ५०२ अंतर्गत नोंद घेण्यात आली. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी सदर नोंद प्रमाणित करण्यात आली आणि त्यावरून वारसा फेरफार क्रमांक ९६८९ तयार करण्यात आला.

सदर फेरफार प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधित हितसंबंधितांना नमुना ९ ची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सुभाष मुरलीधर कदम यांनी फेरफार क्रमांक ९६८९ मंजूर करू नये, अशी हरकत अर्जाद्वारे नोंदवली. हा अर्ज विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवही (६ अ) मध्ये नोंदवून पुढील सुनावणीसाठी मंडळ अधिकारी, ढोकी यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

मंडळ अधिकाऱ्यांनी अर्जदार व आक्षेप अर्जदार या दोन्ही बाजूंना वाजवी मुदत देऊन त्यांचे लेखी तसेच तोंडी म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर न्यायालयाच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित वारसा फेरफार क्रमांक ९६८९ मंजूर करण्यात आला असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सुभाष मुरलीधर कदम यांनी फेरफार मंजूर झाल्यानंतर हा फेरफार चुकीचा असून त्यामध्ये त्यांचे नाव जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयाची व स्वतःची दिशाभूल झाल्याचा दावा करत त्यांनी ९ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सादर केला होता.

मात्र प्रशासनाच्या अहवालानुसार वारसा रजिस्टर (६ क) ठराव क्रमांक ५०२ तसेच वारसा फेरफार क्रमांक ९६८९ या दोन्ही नोंदींमध्ये सुभाष मुरलीधर कदम यांचे नाव अनुक्रमांक ८ वर नमूद आहे. तसेच संबंधित जमिनीच्या खात्यात त्यांचे नाव यापूर्वीपासूनच असल्याने संगणकीकृत ७/१२ उताऱ्यावर ते नाव पुन्हा दुबार दाखविले जात नाही. त्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय संबंधित व्यक्ती वारंवार कोणतेही कारण देऊन उपोषणास बसण्याची भूमिका घेत प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे. प्रशासनाने समुपदेशन करून कायद्यातील तरतुदी समजावून सांगितल्या असतानाही ते ऐकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वारंवार उपोषणाची पत्रे देऊन प्रशासनाला मानसिक त्रास दिला जात असून त्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

तसेच बॅनर लावून आणि विविध डिजिटल माध्यमांना मुलाखती देऊन प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी केल्याचाही आरोप प्रशासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर केवळ प्रशासनाला त्रास देणे आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने उपोषणाची घोषणा करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुभाष मुरलीधर कदम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक, ढोकी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या कारवाईबाबतचा अनुपालन अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here