धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी मोडली शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकांतच ठेवण्याच्या धोरणाची चौकट

0
234

स्थानिक स्वराज्य संस्थांचा चौदा कोटींचा निधी खाजगी बँकेत हलविण्याचे आदेश

धाराशिव (आकाश नरोटे)– शासनाने दिलेला निधी कुठे वापरायचा आणि कुठे ठेवायचा याबाबत स्पष्ट धोरण ठरवून दिलेले असताना, धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या धोरणाची चौकट मोडत खाजगी बँकेत निधी ठेवण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया, सांजा रोड शाखेत खाते असून त्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा तब्बल १४ कोटी ५२ लाख ७० हजार इतका निधी शिल्लक होता. मात्र, हा प्रचंड निधी कोटक महिंद्रा बँकेत वर्ग करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्याचे उघड झाले आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०२० पासून लागू केलेल्या आदेशानुसार, सर्व शासकीय कार्यालयांनी आपले बँक व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच करणे बंधनकारक आहे. खाजगी बँकांमध्ये खाती न उघडण्याचे तसेच विद्यमान खाती बंद करण्याचे आदेश सरकारने स्पष्टपणे निर्गमित केलेले असताना, जिल्हाधिकाऱ्यांनीच शासन निर्णयाला धाब्यावर बसवून खाजगी बँकेत खाते उघडणे आणि निधी हलविण्याचा आदेश देणे हे आश्चर्यकारक आणि संशयास्पद मानले जात आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तर निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याशी विचारणा केली असता हे पत्र नियोजन विभागाकडील असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शासन निर्णय मोडणाऱ्या या कारवाईची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. खाजगी बँकांकडून मोठ्या प्रमाणात सी एस आर निधी मिळवण्यासाठी हा खटाटोप असू शकतो किंवा खाजगी बँकांनी प्रशासनाला कुठले प्रलोभन दिले आहे का याबाबत आता उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here