धाराशिव – नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलेल्या धाराशिव मध्ये सध्या भाटगिरी जोरात सुरू असून 46 लाखाच्या पी आर पुढे नोकरशाही जिंकली असून धाराशिवकर हरले आहेत.
गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांचा त्यांनीच आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. नाचायला, आनंदात सहभागी व्हायला कोणाचा विरोध नसतो मात्र जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना, जीवितहानी, वित्तहानी होत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी मंदिराचे प्रमुख म्हणून सहभागी होणे अपेक्षित होते मात्र कलाकारांच्या आग्रहाला हो म्हणत त्यांनी ठेका धरला आणि तो व्हिडिओ त्यांच्या पी आर टीम ने व्हायरल केला.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी टाकले होते मात्र त्याला बुड ना शेंडा म्हणजेच अधिकृत लेटरपॅड आणि स्वाक्षरी नव्हती.
या प्रकरणाची पुन्हा चर्चा का?
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना नको ते बोल सुनावले होते मात्र त्याच व्यक्तीने त्यांची आज भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांबद्दल गैरसमज झाला होता आणि धाराशिवमधून त्यांना दोन तीन लोकांनी फोन करून जिल्हाधिकारी तसे नाहीत असे सांगितले त्यामुळे त्यांची भेट घेतल्याचे सांगितले. पी आर टीमच्या व्यक्तीने फोन करून भेटीचा समन्वय घडवून आणल्याची चर्चा यानिमित्ताने झाली सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओचे शांत झालेले प्रकरण पुन्हा चर्चेत आले.
आंदोलनाचा आर डी सी पॅटर्न
अधिकाऱ्यांवर एखादी गोष्ट शेकली की महसूल संघटनांना पुढे करून प्रशासनावर दबाव आणण्याचा आर डी सी पॅटर्न गेल्या काही महिन्यात रुजू झाला आहे. यात महसूल कर्मचाऱ्यांची इच्छा असो की नसो कर्मचाऱ्यांनी अधिकारी ज्या निवेदनावर सांगतात त्या निवेदनावर निमुटपणे स्वाक्षरी करायची असा दंडक आहे. तोच आर डी सी पॅटर्न आज दिसून आला नव्या पडलेल्या प्रथेप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांनी कळ्या फिती लावून आंदोलन केले देखील.
पी आर टीमच्या साथीला लाभार्थी गँग
कथित पी आर टीम जिल्हाधिकाऱ्यांची बाजू जोरदारपणे लावून धरत आहे मात्र त्यांना साथ मिळाली ती जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या विविध समित्यांवर असणाऱ्या याच अशासकीय सदस्यांनी जिल्हाधिकारी किती चांगले आहेत याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरवल्या. मात्र या अशासकीय सदस्यांची अनेक कामे गेल्या अनेक महिन्यापासून पेंडींग असून अडचणीत आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना खुश करून पदरी काही पडते आहे का हे पाहीले जात आहे.
धाराशिवकर हरले कुठे?
जिल्हाधिकाऱ्यांची जिल्ह्यात कुठे शेती नाही त्यांचा कोणाच्या बांधला बांध नाही मात्र तुळजाभवानी मंदिराचे 2 जनसंपर्क अधिकारी त्यांच्या साथीला 3 सहायक जनसंपर्क अधिकारी असताना आणि माहिती जनसंपर्क विभागाचे जिल्हा माहिती कार्यालय श्री तुळजाभवानी मंदिराचा प्रचार प्रसार करत असताना 46 लाख खर्च करून प्रसिद्धीचे टेंडर का काढावे लागले आणि टेंडर काढले नसेल तर आम्ही टेंडर काढले नाही अशी भूमिका प्रशासन घेताना का दिसत नाही. पावसाळ्याच्या दिवसात जवळपास 8 ते 9 कोटी खर्च करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा नेमका घाट कोणी घातला हे विचारायला सामान्य धाराशिवकर कमी पडले आणि तेथेच हरले.
आम्ही प्रशासनाच्या सोबतच
जिल्ह्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नेहमी सोबतच आहेत यापुढेही राहतील मात्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात प्रशासनाचा कारभार दिला जात असेल तर त्याला विरोध होणे किंबहुना तो जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.
४६ लाखाच्या टेंडरवर कोण बोलणार?
पी आर टीमचे 46 लाखाचे टेंडर आहे. त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पारदर्शक माहिती माध्यमांच्या समोर आणून दूध का दूध पाणी का पाणी करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आकाश महादेव नरोटे
कार्यकारी संपादक
दैनिक जनमत
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
