मोटारसायकल चोर टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात – चार चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी पकडले

0
95

धाराशिव, दि. २८ ऑक्टोबर : प्रतिनिधी

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी करत चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, दोन संशयित इसमांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाला धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्याच्या मोहिमेत असताना, कळंब येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आणले आहेत. प्राप्त माहितीनुसार पथकाने तत्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोरी केलेल्य मोटारसायकलींची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून पथकाने त्यांच्या ताब्यातून एकूण चार मोटारसायकली जप्त केल्या.

गुन्हे शाखेने तपास करताना या मोटारसायकली आनंदनगर, तुळजापूर, येरमाळा (धाराशिव जिल्हा) आणि मुरुड (लातूर जिल्हा) या ठिकाणांहून चोरीस गेल्या असल्याचे उघड झाले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1️⃣ अर्जुन साहेबराव काळे (वय २९ वर्षे, रा. वाकडी पारधी पिढी, ता. कळंब, जि. धाराशिव)
2️⃣ नितीन विश्वास शिंदे (वय २५ वर्षे, रा. नांदूर, ता. केज, जि. बीड, ह.मु. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव).

दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, तसेच शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here