भाजपने टेकले गुन्हेगारांसमोर गुडघे,महंतांना डावलून ड्रग्स प्रकरणातील आरोपीला भाजपाने दिली उमेदवारी!

0
357

धाराशिव (आकाश नरोटे)- संत महंत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात अलीकडच्या काळात महंत, मठ प्रमुख यांना उमेदवारी देण्याचे प्रमाण वाढले आहे. बिघडलेल्या राजकारणात महंत उमेदवार असतील तर आशादायी चित्र राहील या उद्देशाने अशा उमेदवाऱ्या दिल्या जातात. संस्कृती रक्षक म्हणून स्वतःचा प्रचार करणारा भारतीय जनता पक्षाने मात्र महंतांना डावलून थेट ड्रग्स प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत नगराध्यक्षपदासाठी भाजपने विनोद गंगणे यांना अधिकृत उमेदवारी दिली मात्र ही उमेदवारी गिरिगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी यांना डावलून देण्यात आल्याने भाजपला राजकारण कुठे नेऊन ठेवायचे आहे याचा मेळ लागताना दिसत नाही. महंत इच्छागिरी महाराज हे मोठे प्रस्थ असून क्लीन इमेज आहे सोबत नागपूर येथून त्यांच्यासाठी आग्रह असताना विनोद गंगणे यांना उमेदवारी का दिली गेली हे न उलगडलेले कोडे आहे. तुळजापूर चे राजकारण आ. राणाजगजितसिंह पाटील पाहतात अर्थात तिथे नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांच्याच मर्जीतला असणे स्वाभाविक होते. निधी मंजूर करून आणला म्हणून त्यांचा सत्काराचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्याचे आयोजक विनोद गंगणे हेच होते. त्यावेळी देखील ड्रग्स प्रकरणावरून मोठी टीका झाली होती. मात्र आता महंतांना डावलून जर भाजप उमेदवारी देत असेल तर ज्यांच्याकडे आर्थिक रसद आहे त्यांनाच उमेदवारी असा नवा पायंडा भाजप मध्ये पडत असून हे राजकारणासाठी धोकादायक आहे. गुन्हेगारांना शासन व्हावे समाज सुधारावा अशी भूमिका सत्ताधारी भाजपकडे असणे अपेक्षित होते प्रत्यक्षात मात्र भाजपने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकल्याचे यानिमित्ताने चर्चिले जात आहे.

ड्रग्स प्रकरणात मुख्यमंत्र्यांची चुप्पी

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुप्पी राखली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत ड्रग्स बाबत त्यांनी ठोस भूमिका कधीच जाहीर केली नाही. मात्र भाजपमध्ये या प्रकरणातील आरोपींचा वावर असून विनोद गंगणे यांना उमेदवारी देऊन आरोपींना गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप आहे.

सुप्रिया सुळेंचे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ड्रग्स प्रकरणातील आरोपींना भाजप मध्ये प्रवेश दिल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले होते, दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र त्याला देखील फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही.

जिल्ह्यात नव्हे राज्यात होणार परिणाम

ड्रग्स च्या विळख्यात अडकलेली तरुणाई आणि प्रमुख राजकीय पक्ष असलेला भाजप त्या गुन्ह्यातील आरोपींना उमेदवारी देत असेल तर त्याचे पडसाद केवळ धाराशिव जिल्ह्यात होणार नसून राज्यभर त्याचा फटका भाजपच्या इमेजला बसणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here