भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0
156

वाशी, दि. १७ (प्रतिनिधी) – भूम पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर पैशाच्या मोबदल्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून पुढील तपासात आणखी साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ईट–जातेगाव रोडवर किनारा हॉटेलजवळ श्रीकृष्ण अर्जुन बांगर (वय ३९, रा. पाटोदा, जि. बीड) व त्यांचे सहकारी रविंद्र राख हे बोलेरो गाडीतून जात असताना चार अनोळखी इसमांनी गाडी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९०/२०२५ भा. न्याय संहिता कलम १०९ (१), ११५ (२), ११८ (१), ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सलमान पठाण (रा. भूम) व रितेश अंधारे (रा. हाडोंगरी) या दोघांना येरमाळा उड्डाणपुलाजवळून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पैशाच्या मोबदल्यात हा हल्ला केल्याची कबुली दिली तसेच इतर साथीदारांची नावेही सांगितली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर, चालक नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे व प्रकाश बोईनवाड यांनी सहभाग घेतला.

ही धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक  रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here