लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडे
धाराशिव – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे राजकारण सुरू असून गतवर्षी त्यांच्या स्मारकासाठी जागा मिळून देखील वर्षभर स्मारक होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले नाहीत मात्र जयंती जवळ आल्याने विचारणा होईल म्हणून जयंतीच्या तोंडावर जागा विनाशुल्क देण्याचे पत्र तुळजापुरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूलमंत्र्यांना दिल्याने सरकारने आणि प्रशासनाने हे स्मारक होण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
1 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे स्मारकासाठी दूध संघाची 1 एकर जागा देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय काढला तो काढल्यानंतर वेगाने हालचाल अपेक्षित होती, नगरपालिकेवर प्रशासक म्हणजे सरकारची सत्ता असताना त्याबाबत वर्षभरात कुठलीच कार्यवाही झाली नाही. स्मारक व्हावे म्हणून आ. कैलास पाटील यांनी विधानसभेत 2023 मध्ये आवाज उठवला होता त्यानंतर स्मारक मंजूर देखील झाले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी 16 जुलै 2025 रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले त्यात त्यांनी नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आणि धाराशिव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी नगरपरिषदांकडे निधी नसल्याने त्याचे मूल्यांकन माफ करावे असे पत्र लिहिले. सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा केला याबाबत दुमत नाही मात्र जयंती डोळ्यासमोर ठेऊन पत्र आणि निवेदने सादर केली जात असतील ते देखील सत्ता असताना तर त्याला गतिमानता म्हणावी का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या पत्रावर अवर सचिव महसूल आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांना तत्काळ प्रस्ताव करण्याचे निर्देशित केले असले तरी उद्या जयंती असताना कुठल्याच हालचाली दिसत नाहीत मात्र पत्रप्रपंच न होता तातडीने स्मारकावर काम करण्याची नागरिकांची मागणी आहे. स्मारकासाठी जागा मंजूर झाली त्या शासन निर्णयामध्ये मूल्यांकन करून संबंधित शासन यंत्रणेकडून ती रक्कम वसुली करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आहेत. यानिमित्ताने धाराशिव नगरपालिका निधी भरण्यास सक्षम नसेल तर प्रशासक काळात नगरपालिकेतील पैसा नेमका गेला कुठे? अनाठायी कामासाठी निधी वापरला गेला का? त्याला प्रशासक जबाबदार की सरकार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.